GROUND REPORT | कैद्यांनी फुलवलं नंदनवन !

तीन महिन्यात 2 लाखांचा भाजीपाला विकून शासनाला दिला निधी
Edited by: देवयानी वरसकर
Published on: April 20, 2023 15:26 PM
views 241  views

जग हे बंदिशाळा..  हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल.  परंतु या बंदिशाळेतील बंदीजनांना सिंधुदुर्ग कारागृहात एक वेगळी जगण्याची उमेद मिळाली आहे, आणि तीही शेतीतून !


गुन्हेगारीत अडकलेले हात जेव्हा शिक्षेनंतर बंदिवान म्हणून कारागृहात दाखल होतात, व हेच हात कारागृहातील भकास माळरानावर नंदनवन फुलवतात तेव्हा मात्र या बंदिवानांमध्ये जिवंत असलेली माणुसकी मेहनत करण्याची क्षमता व अविचाराला लगाम घालण्याची पात्रता त्यांच्या दिसून येते. या कैद्यांमधील माणुसकी जपत त्यांच्या हाताला काम देऊन भाजीपाला वनशेतीतून फुलवलेले नंदनवन पाहून खूपच समाधान वाटते!


भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर व येथील वरिष्ठ तुरुंग अधिकारी रवींद्र टोंगणे यांनी या बंदिजनाच्या मनात निर्माण केलेला विश्वास अभिमानास्पद वाटतो. बुधवारी हा कारागृह पाहण्याचा मुख्यालय पत्रकारांना योगायोग आला, अन बंदिवान कैद्यांचा जीवनप्रवास अनुभवता आला !




रागाच्या भरात किंवा स्वतःवरील संयम सुटल्यामुळे गुन्हे होतात व आरोपींना शिक्षा होऊन ते कारागृहातील बंदीवान  होतात. भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या पुढाकारामुळे मुख्यालय पत्रकार संघाचे सर्व सभासद पत्रकारांनी बुधवारी जिल्हा कारागृहाला भेट दिली. बंदिवान कैद्यांशी संवाद साधला. कारागृहातील बंदी अर्थात कैदी हे पण माणूस आहेत, त्यांच्यातही माणुसकी जिवंत आहे, ही जाणीव आज झाली. या कारागृहाचे वरिष्ठ  तुरुंग अधिकारी रवींद्र अर्जुन टोंगणे यांनी केवळ तुरुंग अधिकारी म्हणून न राहता या बंदिजनांमधील सुप्त गुणांना चालना दिली आहे. 

 

न्यायालयीन निर्णयानंतर काही कैदी न्यायालयीन कोठडीत येतात. तर काही कैदी शिक्षा भोगणारे असतात. सिंधूदुर्गनगरी येथील हे जिल्हा कारागृह वर्ग एक प्रतीचे आहे. येथे 120 बंदिजन राहू शकतील एवढे बॅरॅक आहेत. बांधकाम वाढवले तर 200 राहू शकतील, एवढा या कारागृहाचा दर्जा आहे. सध्या या कारागृहात 96 कैदी असून  बारा कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे आहेत. तर 36 बंदिजन न्यायालयीन कोठडी मधील आहेत. या सर्व बंदिजन शेतीमध्ये केलेले काम खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. गेल्या तीन महिन्यात त्यांनी दोन लाखाची भाजीपाला विकून शासनाला निधी दिला आहे.


रागाच्या भरात नकळतपणे गुन्हा होतो व त्याची शिक्षा भोगताना पश्चाताप होतो व ही परिस्थिती सहन करणारी नसते! खरे तर रागाच्या भरात आपण चुकलो अशी कबुली नांदेड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून असलेल्या एका कैद्याने मुख्यालय पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. घरगुती वादातून आपण व आपला मुलगा माझ्या सासूला ढकल्याने तिचा मृत्यू झाला व तिच्या मृत्यूस जबाबदार ठरल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल होऊन आम्हा बापलेकांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आपली दोन वर्षे शिक्षा बाकी असून या कारागृहात वरिष्ठ तुरुंगाधिकारी रवींद्र टोंगणे यांनी दाखवलेली माणुसकी व दिलेली शिकवण खूप मोलाचे आहे. आपली नोकरी गेली आता नोकरी मला मिळणार नाही तरीपण मी  या कारागृहातील सिंधुदुर्गच्या मातीत मी शेती शिकलो. दोन वर्षानंतर शिक्षा बघून बाहेर पडल्यानंतर नांदेड मधील माझ्या गावाकडे एक उत्तम शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवेन असा विश्वास आहे या कैद्याने मनमोकळेपणे व्यक्त केला !


सात एकरच्या क्षेत्रावर भाजीपाला शेती करून केलेली प्रगती या कारागृहाची प्रतिष्ठा वाढविणारी ठरली आहे. या कारागृहात असलेले 96 कैदी एवढे नंदनवन फुलवतात तर देशात पाच लाखाच्या घरात असलेले कारागृहातील काही त्यांच्या हात अशा विकासासाठी जोडले गेले तर एक वेगळा चमत्कार होईल. दो आँखे बारह हाथ मधील बंदिजन आणि जेलर ही कथा इथे फिरताना सहजच आठवत होती हे मात्र निश्चित!!     


सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनीही ही शेती करण्यासाठी कैद्याना तात्काळ ट्रॅक्टर  उपलब्ध करून दिला.  याबद्दलही तुरुंग अधिकारी रवींद्र टोंगणे यानी त्यांच्या सहकार्याबद्दल आवर्जून उल्लेख केला.