नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहारचा शुभेच्छा सोहळा उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: April 17, 2024 11:30 AM
views 151  views

सावंतवाडी : मातृभूमी शिक्षण संस्था संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार, सबनीसवाडा, सावंतवाडीचा वार्षिक शुभेच्छा सोहळा सोमवार १५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुलांवर ज्यावेळी संस्कार झाले पाहिजेत तेच संस्कार नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार मधून झालेले दिसले ते बालवाडीतील मुलांनी जीव ओतून सादर केलेल्या दिग्गज कवींच्या कवितांमधून त्यामुळे शुभेच्छा सोहळ्यात खरी रंगत आली. संस्थेचे सचिव गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविकात शाळेची जडणघडण आणि मुलांवर केले जाणारे संस्कार, शाळेत राबविले जाणार उपक्रम आदींची माहिती दिली. उद्घाटक कवी दीपक पटेकर व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन झाले, त्याचप्रमाणे देवी सरस्वती व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक लेखक कवी दीपक पटेकर, प्रमुख अतिथी सौ.आदिती दळवी (कुडाळ), संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सोनल लेले, सचिव गणेश ठाकूर, उपाध्यक्ष भरत गावडे, श्री. करमळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहारच्या बालवाडीतील दिक्षा टिळवे हिने प्रत्येक वाक्यात भाव प्रकट करत सादर केलेली कवी कुसुमाग्रजांची "कणा",  हर्षवर्धन करमळकर ने सादर केलेली विंदांची "आयुष्याला द्यावे उत्तर" यांचं सादरीकरण उच्चप्रतीचे, बालवाडीच्या मुलांचे वाटतच नाही. शिशुविहारच्या संस्थाध्यक्षा व शिक्षकांनी मुलांची करून घेतलेली तयारी नक्कीच कौतुकास्पद आहे, असे कौतुक समारंभाचे उद्घाटक कवी दीपक पटेकर यांनी केले. मराठी शाळांमधूनही अशी हुशार मुले घडतात, मातृभाषेतून शिक्षण घेऊनच आयुष्यात यशस्वी होतात. मुलांना इंग्रजी शिकवाच परंतु मूळ पाया मातृभाषेतून शिक्षण देऊन द्या असे पुढे बोलताना दीपक पटेकर यांनी सांगितले व बालवाडी मधून पहिलीत जाणाऱ्या मुलांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

शुभेच्छा समारंभाच्या प्रमुख अतिथी सौ.आदिती दळवी यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमाचे आणि अध्यक्षा डॉ.सोनल लेले व संस्था सदस्य, शिक्षिका सौ.उर्मिला राणे, सौ.प्रांजल टिळवे, सहाय्यिका सौ.प्रतिभा गवळी आदी राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले आणि मुलांना शुभेच्छा दिल्या. पालक प्रतिनिधींकडून मनोगत व्यक्त करताना सौ.ईश्वरी तेजम व सौ.पूजा धुरी यांनी शाळेतील शिक्षण, उपक्रम, शाळा घेत असलेली मेहनत आणि मुलांवर केले जाणारे संस्कार यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. संस्थाध्यक्ष डॉ.सोनल लेले यांनी पहिलीत जाणारी कु.सानवी गोसावी हिच्या शुभेच्छा पत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात वाचनाने शुभेच्छा समारंभास सुरुवात झाली. सानवीला तिची शारीरिक व बौद्धिक क्षमता पाहून डॉक्टरांनी विशेष शाळेत घालण्याचा सल्ला पालकांना दिला होता. परंतु सानवीच्या आईने संस्थेच्या अध्यक्षांसोबत सल्लामसलत करून तिला नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार मध्ये प्रवेश घेतला आणि तिच्यात आमूलाग्र बदल झाले, आज ती पहिलीत प्रवेश घेते ही घटना सांगताना संस्थाध्यक्षा डॉ.लेले यांना गहिवरून आले. यावेळी बालवाडी मधून पहिलीत जाणारी राशी करमळकर, दीक्षा टिळवे, हर्षवर्धन तेजम, जिविका धुरी, सानवी गोसावी, मेघना ठाकूर यांना उद्घाटक दीपक पटेकर व प्रमुख अतिथी सौ.आदिती दळवी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजेत्या मुलांना देखील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. यावेळी पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या पालकांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहारला भेटवस्तू देऊन कौतुक केले. सोहळ्याचे आभार प्रदर्शन करताना संस्था उपाध्यक्ष श्री.भरत गावडे सरांनी अशाप्रकारच्या शाळा सुरू होण्याची आवश्यकता असून पालकांनी देखील आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे सरकार पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण सर्वांना मराठीतून देण्याबाबत विचार करत असल्याचे सांगून समारंभास उपस्थित मान्यवरांसह पालकांचे आभार मानले. सूत्रसंचालन सौ. प्रांजल टीळवे यांनी केले. हा समारंभ पार पाडण्यासाठी संस्थाध्यक्षा डॉ.सोनल लेले, शिक्षिका सौ.उर्मिला राणे, सौ.प्रांजल टिळवे, सौ.प्रतिभा गवळी यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व पालकांनी देखील मोलाचे सहकार्य केले. यावेळी संस्थेतर्फे सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. राशी करमळकर- चमत्कार, दिक्षा टिळवे- कणा, हर्षवर्धन तेजम- आयुष्याला द्यावे उत्तर, मेघना ठाकूर- वेडं कोकरू, जिविका धुरी- एक होती परी, विघ्नेश तेली- हिरवे बाबा पोपटराव, नित्या जाधव- या बसा, हर्ष राऊळ- पक्षांचे गाणे, जय मांजरेकर- बोटांची जादू, सानवी गोसावी- ट ला ट. आदी कविता सादर केल्या.