ग्रीन ट्रेल फाऊंडेशनचा 'कोकण ट्रेल' सावंतवाडीत

Edited by: विनायक गांवस
Published on: October 18, 2025 17:33 PM
views 16  views

सावंतवाडी : कोकणच्या नयनरम्य निसर्गातून, डोंगर-घाट आणि समुद्रकिनाऱ्यावरून चालण्याचा एक अनोखा आणि आव्हानात्मक उपक्रम 'कोकण ट्रेल २०२५' ग्रीन ट्रेल फाऊंडेशनतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावरून या 'वॉकाथॉन'ची सुरुवात आणि समारोप होईल. या स्पर्धेत देश-विदेशातील सहभागी होतील असा विश्वास व्यक्त करत, जिल्ह्यातील लोकांनी देखील यात सहभागी व्हावे असे, आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन बिर्जे यांनी केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


ते म्हणाले, कोकण ट्रेल २०२५ मध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत. मुख्य ट्रेल १०० किमी अंतर, जे सलग ५० तासांत पूर्ण करायचे आहे. व लघु ट्रेल ५० किमी अंतर, जे २५ तासांत पूर्ण करायचे आहे. या ट्रेलमध्ये व्यक्तिगत सहभाग नाही. २, ३ अथवा ४ सदस्यांच्या टीम स्वरूपात सहभाग घेणे अनिवार्य आहे. सर्व इच्छुकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

हा ट्रेल कोकणच्या हिरवाईतून, डोंगर-घाट, समुद्रकिनारा, गाववाडी, नदीकाठ व जंगलातून जातो. सहभागी टीमला त्यांच्या मर्यादा ओलांडण्याची, कठीण ध्येय गाठण्याची आणि कोकणातील निसर्ग, संस्कृती व लोकजीवन अनुभवण्याची ही एक उत्तम संधी आहे. गावागावातून हा वॉकाथॉन जाणार असून सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातून पुन्हा सावंतवाडी येथे समारोप होणार आहे अशी माहिती श्री. बिर्ज यांनी केल आहे. 

आयोजकांनी ट्रेल मार्गावर सहभागींच्या सोयीसाठी उत्तम व्यवस्था केली आहे. यात सहभागी होणाऱ्या टीमसाठी प्रवेश फी ठेवण्यात आली आहे‌.  प्रत्येक १० किमीवर चेकपॉईंट ठेवलेले आहेत, जिथे वैद्यकीय मदत, पाणी, अन्न व सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रीन ट्रेल फाऊंडेशनने हा उपक्रम स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये व विविध संघटनांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. ज्यामुळे पर्यटनवृद्धी साधली जाईल. यामध्ये स्थानिक खेळाडू, माध्यम प्रतिनिधी, व्यावसायिक यांचाही सहभाग असेल अशी माहिती त्यांनी दिली. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वा. याला सुरूवात होणार आहे. ३० नोव्हेंबरला याचा समारोप होईल, जिमखाना मैदान सावंतवाडी येथून यास प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन बिर्जे, सदस्य केदार लेले आणि प्रशांत सावंत आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी ९३२५५९६९८६/७७४५०४६२६५/९६६५१९६११५/९४२२१९४७८९ संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केलं.