'आराध्य सिनेमा' थिएटरचं शानदार उद्घाटन..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 01, 2023 18:39 PM
views 227  views

सावंतवाडी‌ : मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट नजिक सुरू केलेल्या आराध्य हॉटेल येथील 'आराध्य सिनेमा' या थिएटरचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर यांच्या हस्ते पार पडलं. बांधकाम व्यावसायिक उदय पारळे व सौ.स्मिता पारळे यांच्या संकल्पनेतून हे सिनेमागृह साकार झालं आहे. या 'आराध्य सिनेमा'मुळे मनोरंजनासह खाद्यपदार्थांची मेजवानी प्राप्त झाली आहे. 

याप्रसंगी उपस्थित उद्घाटक रेणूताई गावस्कर म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिनेरसिकांसाठी मल्टिप्लेक्स थिएटरची उणीव बांधकाम व्यावसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी सौ.स्मिता पारळे यांनी "आराध्य सिनेमा"च्या निर्मितीतून भरुन काढली आहे.  

भविष्यात या सिनेमा थिएटरमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. साधारण दीड वर्षांपूर्वी आपण कोकणात आले.  आपल्याला सिनेमा पाहण्याची असलेली प्रचंड आवड लक्षात घेता या ठिकाणी जवळपास सिनेमा थिएटर उपलब्ध नसल्याचे ऐकून एक प्रकारची खंत मनात निर्माण झाली होती. परंतु ही खंत आज आराध्य सिनेमाच्या माध्यमातून दूर होत आहे याचा आपल्याला आनंद होत आहे. सिनेमा हे अत्यंत महत्त्वाचे प्रभावशाली शैक्षणिक माध्यम आहे. दोन-तीन तास एकाच ठिकाणी एकाग्रतेने एखाद्या कथा मालेत आपण तल्लीन झाल्यानंतर तो सिनेमा आपल्याला विचार करण्यासाठी खूप मोठे खाद्य देत असतो. त्यामुळे आपल्या मुलांच्या भावविश्वाला चालना द्यायची असेल तर प्रत्येकाने मुलांसोबत एकदा तरी सिनेमा पहिल्याच पाहिजे. एकुणच पर्यटनदृष्ट्या प्रगतीपथावर आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिनेमा थिएटरची उभारणी करुन श्री व सौ. पारळे यांनी यामध्ये आणखीनच भर  टाकली आहे.

यावेळी उद्योजक शैलेश पै म्हणाले, ज्याच्या नावातच उदय आहे अशा उदय पारळे यांनी आत्तापर्यंतच्या सर्व स्वतःच्या वाटचालीत अनेकांच्या जीवनात उदय आणला. अनेकांच्या हाताला काम देण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न राहीला. आयुष्यात काहीतरी करायचे आहे या जिद्दीने त्यानी आकाशाला गवसणी घातली आहे. मात्र, त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहीले आहेत. कामगार वर्ग हा सुद्धा आपल्या कुंटूबातीलच घटक आहे असे मानुन ते काम करत आलेत आणि म्हणूनच ते इथपर्यंत झेप घेऊ शकते. तर अँड. नकुल पार्सेकर म्हणाले, बांधकाम क्षेत्रात सुरुवातीला नोकरी करणारा हा युवक कष्ट आणि मेहनतीतून इथवर पोहचला आहे. त्यांच्या या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. सिनेरसिकांची गरज लक्षात घेऊन सुसज्ज असे हॉटेल व सिनेमागृह आज त्यांनी उभं केलं आहे. पर्यटन विकासाला ते निश्चितच चालना देईल.


यावेळी प्रास्ताविकात उदय पारळे म्हणाले, सिंधुदुर्गातील कमतरता लक्षात घेऊन अशा प्रकारचे सिनेमा थिएटर, रेस्टॉरंट, बेन्कवेट  हॉल आदी सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारी वास्तू उभारण्याची इच्छा आपल्या मनात होती. हीच इच्छा घेऊन आपण वाटचाल सुरू केली आणि इथपर्यंत पोहचलो. या आपल्या प्रवासामध्ये आई वडिलांसोबत पत्नीची खूप मोठी साथ लाभली. बांधकाम क्षेत्रातील मित्रपरिवार आर्किटेक यांचेही योगदान यामध्ये महत्त्वाचे आहे. मुळात सिनेमा थिएटर ही संकल्पना मित्र विजय सावंत यांच्या संकल्पनेतून आलेली आहे. यामध्ये अनेकांचे एकत्रित हात आहेत. भविष्यातही अशा नवनवीन संकल्पनेतून जिल्ह्याच्या पर्यटनासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्यांनी ज्यांनी त्यांना या प्रकल्पाच्या वाटचालीस मदत केली ज्यांचे योगदान लागले त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शन सौ.स्मिता पारळे यांनी मानले. सुत्रसंचलन डॉ. सुमेधा नाईक यांनी केल. 

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर, उद्योजक शैलेश पै, कर सल्लागार अशोक सारंग, आर्किटेक्ट साहस पाटील, आकेरी सरपंच महेश जामदार, श्री. तेली, श्रीराम धुरी, शरद सावंत,सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर, उदय पारळे, स्मिता पारळे, राजेंद्र पाटील, निरज देसाई, डॉ.हर्षदा देवधर, श्रीराम धुरी आदी उपस्थित होते.