क्रेट्स - ताडपत्रीसाठी सिंधुरत्नमधून अनुदान..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 11, 2024 09:59 AM
views 622  views

देवगड : देवगड तालुक्यातील विविध फळ पिकाखालील क्षेत्र साधारणतः 20397 हेक्टर आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर विविध फळ पिकाखालील क्षेत्र आहे,मात्र फळपिकांची काढणी करताना साधारणतः 15 ते 20 % इतके उत्पन्न हाताळणी करताना फळपिकांचे नुकसान होते. त्यामुळे फळपिकांचे काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन 2023-24 अंतर्गत प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी करीता 75 % अनुदान तत्वावर मंजुरी देण्यात आली आहे. प्रस्तुत योजनेत पात्र शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.20 हे. क्षेत्र फळपिकाखालील असावे व फळपिकांची नोंद 7/12 वर असावी, एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल, अनुसुचीत जाती व अनु. जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

प्रति प्लास्टिक क्रेट्स साठी अंदाजपत्रकीय रक्कम रु. 480/- आणि प्रति प्लास्टीक ताडपत्रीसाठी रु. 2000/- आहे, त्यानुसार 75 % अनुदान (GST वगळून) प्रमाणे सदर प्लास्टिक क्रेट्स साठी जास्तीत जास्त रु. 360/- प्रति क्रेट्स किंवा प्रत्यक्ष खरेदी किंमतीच्या 75 % (GST वगळून) यापैकी जे कमी असेल ते आणि प्लास्टिक ताडपत्री साठी जास्तीत जास्त रु. 1500/- प्रति ताडपत्री किंवा प्रत्यक्ष खरेदी किंमतीच्या 75 % (GST वगळून) यापैकी जे कमी असेल अनुदान देय राहील. तसेच एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त 15 क्रेट्स व 1 ताडपत्री याप्रमाणे कमीत कमी एका शेतकऱ्याने 10 क्रेट्स व 1 ताडपत्री खरेदी करणे बंधनकारक राहील. प्लास्टिक क्रेटस चे आकारमान 525 मिमी (लांबी) 360 मिमी (रुंदी) 305 मिमी (उंची) असून अंदाजे क्षमता 20 किलो आणि वजन 1.90 किलो/क्रेटस असावे तसेच प्लास्टीक ताडपत्रीचे आकारमान 6 मी x 4 मी (330 मायक्रॉन जाडीचे) असावे. सर्व साहित्य BIS/ISI प्रमाणित असणे बंधनकारक असेल.

या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने द्यावयाचे आहे, लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी काढण्यात येईल, साहित्य खरेदीची पावती GST सहित असावी, सदरचे साहित्यासाठी इतर योजनांचा लाभ घेतला नाही याबाबत हमीपत्र देण्यात यावे, खरेदीच्या साहित्यावर Embossing करणे आवश्यक आहे. तरी सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा आपल्या गावाचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतक-यांनी दिनांक 19.01.2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कैलास ढेपे, तालुका कृषी अधिकारी देवगड यांनी केले आहे.