दीविजा वृध्दाश्रमात ‘आजी आजोबांची बालवाडी’

Edited by:
Published on: December 05, 2023 17:45 PM
views 135  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे (ता. कणकवली) येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या दिविजा वृद्धाश्रमात 'आजी आजोबांची बालवाडी' घेण्यात आली. शाळेत असतानाचे ते दिवस पुन्हा अनुभवता यावेत, ते खेळ, ती दंगा मस्ती करता यावी यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी सौ. सुषमा चव्हाण, श्रीम. किरण घाडी, सौ. संगीता राणे यांनी शिक्षिका म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली. या वर्गाचा आजी आजोबांनी मनापासून आनंद घेतला.

या आजी आजोबांच्या बालवाडी उपक्रमाचा शुभारंभ या बालावाडीच्या शिक्षिका सौं सुषमा चव्हाण, व श्रीम किरण घाडी व सौं संगीता राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. वृद्धापकाळ म्हणजे दुसरे बालपण असते. याच बालपणात शाळेत अनुभवायचे दिवस पुन्हा या वृध्दाश्रमातील आजी आजोबांना अनुभवता यावेत, यासाठीच 'आजी आजोबांची बालवाडी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपल्या लहानपणी बालवाडीचा पहिला दिवस ते बालवाडीतील अनेक गीते, नृत्य आणि मज्जा सगळे यावेळी अनुभवायला मिळाले. 

बालवाडीच्या पहिल्या दिवशी बालवाडीतील आजी आजोबांना शाळेचे कपडे देण्यात आले. आजी आजोबांना एका रांगेत येऊन वर्गात प्रवेश करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, बडबडगीते, गोष्टी तसेच आजी आजोबांचे खेळ घेण्यात आले. 

बालवाडी घेण्याचा उद्देश सांगताना स्वस्तिक फाऊंडेशनचे विश्वस्त संदेश शेट्ये म्हणाले की, ह्या वयोगटात आजी आजोबांनी बालवाडी उपभोगली नव्हती. त्यांना बालवाडीचा आनंद काय असतो? बालवाडीत शिस्त लावली जाते व कशाप्रकारे शिक्षण दिले जाते? याचा अनुभव उपभोगण्यासाठी या बालवाडी कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. ह्या बालवाडीमुळे आजी आजोबांचा मानसिक स्वास्थ्यही बराच बदल होतो. एक दिवसाचा या कार्यशाळेत आजी आजोबांची मने उत्साहित होत जातात. थकलेल्या जीवाला पुन्हा जोमाने लढत पुढे जाण्याची ताकद येते. या कार्यक्रमासाठी दीविजा वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग, आजी आजोबा व संस्थेचे ट्रस्टी संदेश शेट्ये आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.