
मालवण : इंडियन ऑईल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडेमी तसेच महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक निशाकांत पराडकर यांच्या हस्ते झाले. हा उद्घाटन समारंभ जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी निशाकांत पराडकर यांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना शुभेच्छा देताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव टेबल टेनिस खेळामध्ये उज्वल करावे, असे सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिसच्या खेळाडूंना संधी मिळावी, आणि टेबल टेनिस खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी इंडियन ऑइलच्या सहकार्याने ही स्पर्धा मालवणमध्ये दरवर्षी आयोजित केली जाते. या उद्घाटन समारंभाप्रसंगी सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी दिलीप हुनारी, सेवानिवृत्त आयटी ऑफिसर शशांक घुर्ये, प्रदीप डिचोलकर, तसेच महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर, रवींद्र तळाशिलकर, शुभम मुळीक, अजय जोशी, पंकज पेडणेकर, प्रांजल जाधव, मेघना वारंग, पत्रकार समीर म्हाडगूत तसेच स्पर्धक, पालक व टेबल टेनिसचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण पिंगुळकर यांनी केले.