LIVE UPDATES

वीज संकटाने दोडामार्ग हैराण; महावितरणच्या ठेकेदारांवर बाबुराव धुरी यांचा निशाणा

तालुक्यात सलग ३ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 04, 2026 21:31 PM
views 30  views

अपयशी ठेकेदारांना हटवून स्थानिक कुशल कामगारांना संधी देण्याची मागणी

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीजखंडितामुळे नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीला महावितरणच्या ठेकेदारांचे निष्क्रिय आणि नियोजनशून्य कामकाज कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रशासनावरही ताशेरे ओढले आहेत.

वीज वितरण च्या भोंगळ कारभारा बाबत बोलताना धुरी यांनी म्हटले आहे की, महावितरणकडून सातत्याने त्याच- त्याच ठेकेदारांना कामे दिली जात असल्याने त्यांच्या कामकाजात मनमानी वाढली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नियोजनाविना कामे केली जात असल्याने अगदी किरकोळ बिघाड दुरुस्त करण्यासही विलंब होत असून संपूर्ण तालुक्याला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय संबंधित ठेकेदारांकडून स्थानिकांऐवजी परप्रांतीय कामगारांवर अधिक भर दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्थानिक प्रशिक्षित आणि अनुभवी कामगारांना संधी दिल्यास वीज बिघाड तातडीने दूर होतील, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि ग्राहकांनाही अधिक चांगली सेवा उपलब्ध होईल, असे धुरी यांनी स्पष्ट केले.

महावितरणने आता केवळ पाहण्याची भूमिका न घेता ठोस कारवाई करावी, अशी मागणी करत धुरी म्हणाले की, सध्या कार्यरत असलेले तिन्ही ठेकेदार वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम करण्यात अपयशी ठरत असतील, तर त्यांचे ठेके तात्काळ रद्द करून सक्षम आणि जबाबदार नवीन ठेकेदारांची नियुक्ती करण्यात यावी.

वारंवारच्या वीजखंडितामुळे दोडामार्गकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने तातडीने कठोर निर्णय घ्यावेत. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा आक्रमक इशाराही बाबुराव धुरी यांनी दिला आहे. अधिकारी ज्या जागरूकतेने कंपनीची वीज बिले वसुली करण्यासाठी ग्राहकांच्या आणि कर्मचारी यांच्या मागे लागतात, त्याचप्रमाणे नागरिकांना सुद्धा नियमित विजसेवा देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.