LIVE UPDATES

महावितरणचा निष्काळजीपणा लोकांच्या जीवावर

राज्य सरकार घेणार का गंभीर दखल?
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 04, 2026 21:42 PM
views 51  views

सावंतवाडी : बांदा-कास येथे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ११ केव्ही वीजवाहिनीचा एक विद्युत पोल कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेनंतर कास ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण पंडित यांनी महावितरणच्या बांदा विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निष्काळजीपणामुळे जीव गेल्यास जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी केला आहे.

रात्री या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागली होती. घटनास्थळाच्या अगदी बाजूलाच शाळा असून तिथून विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. ही घटना दिवसाढवळ्या घडली असती तर  मोठी दुर्घटना घडली असती. या निष्काळजीपणामुळे जीव गेल्यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल सरपंच प्रवीण पंडित यांनी उपस्थित केला आहे. महावितरणची सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून अधिकाऱ्यांना वारंवार कल्पना देऊनही या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केलं जातं असा आरोप त्यांनी केला. यापुढे जर असे प्रकार घडत राहिले आणि कोणतीही जीवितहानी झाली, तर त्याला महावितरणचे अभियंताच जबाबदार राहतील असा जाहीर इशारा सरपंच श्री. पंडित यांनी दिला आहे.