
सावंतवाडी : आजची तरुण पिढी अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये आघाडीवर आहे. अंमली पदार्थ हे विष असून विषाची परीक्षा घ्यायला नको, हे आजच्या पिढीला सांगणे गरजेचे आहे. आपले चरित्र, शिस्त, स्फूर्ती, चैतन्य याचा पाया घेऊन विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण केल्यास उत्तुंग यश मिळेल असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ८९ वी पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बापूसाहेब महाराजांची ८९ वी पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले होते. व्यासपीठावर संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले,संस्थेचे कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, सहाय्यक संचालक ॲड.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल भारमल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, प्रा.अन्वर खान, मधुकर देसाई, सुमन गावडे, यशवंत देसाई, मंगेश तळवणेकर, विकास नाईक, संजय लाड, सदासेन सावंत, प्रमोद सावंत, रेश्मा सावंत, काका मांजरेकर, प्रा . दिलीप गोडकर, प्रा.एस एस पाटील,डॉ. पी पी सावंत, विजय देसाई, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी - व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा.माधव भिसे यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा जीवन परिचय करून दिला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या खेमराजीय या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याचबरोबर बारावी बोर्ड परीक्षेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बारावी कला शाखेमधून मधुरा मिलिंद सावंत ८३ % मिळून प्रथम क्रमांक,मिताली संदीप फोंडेकर 80% व आयुष्य अमित देसाई 73% द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेमधून मृणाली दिलीप कालेलकर 80%, दीक्षा दिवाकर सावंत 71 % व श्रुती रवींद्र गावडे 70 % गुण मिळवून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. बारावी विज्ञान मध्ये शिवम अनिल मगदूम 84% अमोल दिगंबर दळवी 81 % व हुझैफा फारुक शहा 79 % गुण मिळवून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला त्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. गायत्री वराडकर हिने भूगोल विषयात 96 मार्क्स मिळवल्याबद्दल तिचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आजचे स्पर्धेचे युग आहे. हीच स्पर्धा आज जीवघेणी ठरत आहे. सोशल मीडियाचा प्रचंड परिणाम आजच्या युवा पिढीवरती होत आहे. कालचे तंत्रज्ञान आज जुने होत आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने बदलणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तरुणाने स्वतःचे करिअर करण त्याचबरोबर सोशल मीडियापासून दूर राहणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक तरुणाचा रोजचा जास्त वेळ हा सोशल मीडियावर व्हाट्सअप, इन्स्टा, युट्युब,फेसबुक यावर जातो. मोबाईल मुळे त्यावर येणारे रिल्स बघून आजची पिढी आभासी जगात वावरत आहे. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू आहे. आज तरुणांजवळ पुस्तक वाचायला वेळ नाही. आभासी जग व वास्तविक जग यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. आभासी जगात वावरल्याने नाती तुटत जातात, तरुणांमध्ये अवस्तव अपेक्षा निर्माण होतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले म्हणाले , बापूसाहेब महाराजांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने आपल्यासमोर ठेवावा. बापूसाहेब महाराजांनी अल्पकाळामध्ये सावंतवाडी संस्थांनचा जो विकास केला त्याच्या खुणा आज संपूर्ण संस्थानमध्ये दिसत आहेत. त्यांचा दूरदर्शीपणा हा संस्थांनच्या प्रगतीमध्ये मोलाचा ठरला आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ पूनम सावंत यांनी केले व आभार प्रा. यु. आर. पवार यांनी मानले.










