
देवगड :विजयदुर्ग येथील श्री दुर्गामाता कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, आयोजित जिम स्विम अकॅडमी, कोल्हापूर यांच्या नियोजनाखाली आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या सहकार्याने आज विजयदुर्गमध्ये भव्य खुली मॅरेथॉन जलतरण स्पर्धा होत आहे. मालपे ते विजयदुर्ग या खाडीमध्ये ३० किलोमीटर अंतरात ही भव्य स्पर्धा होत असून दहा निवडक स्पर्धक यामध्ये सहभागी झाले आहेत.
यासाठी तेलंगण राज्यातील स्पर्धक तसेच महाराष्ट्रातील ठाणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकही सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना एकूण एक लाख ४४ हजाराची रोख पारितोषिकं तसेच सन्मानचिन्ह आणि मेरिट सर्टिफिकेटस देण्यात येईल. स्पर्धा पूर्ण करणारा स्पर्धकालाही फिनिश मेडल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी १४ जानेवारीला याच नियोजनाखाली पाचशे मीटर, एक किलोमीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर स्पर्धा आयोजित केली असून यामध्ये महाराष्ट्रातील सात वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतचे १६० स्पर्धक सहभागी झाले आहेत. यासाठी एकूण एक लाख अठरा हजाराची रोख पारितोषिकं आणि प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येईल. स्पर्धा पूर्ण करणारा स्पर्धक फिनिश मेडल आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
यावेळी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, सचिव राजेंद्र पालकर, सांगली जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कुलशेट्टी, राज्य संघटनेचे निरीक्षक कैलाश आखाडे, सुधीर चोरगे, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव किशोर पालकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश कदम, राज्य जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे, टेक्निकल ऑपिशियल शैलेश सिंग उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील जलतरणप्रेमींनी तसेच पर्यटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजयदुर्ग ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.