
सावंतवाडी : दिवंगत आबा उर्फ अनिल परुळेकर यांचे स्वप्न आणि हजारो हातांच्या मदतीतून साकारलेली 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'ची हक्काची रुग्णवाहिका आता रुग्णसेवेसाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बुधवार, १ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजता उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे या रुग्णवाहिकेचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी संस्थेचे मार्गदर्शक कै. आबा उर्फ अनिल परुळेकर यांनी संस्थेची स्वतःची रुग्णवाहिका असावी, असे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी संस्थेने "एक सेवाभावी उपक्रम" या माध्यमातून समाजाला मदतीचे आवाहन केले होते. या हाकेला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, सहकारी संस्था आणि क्रीडा मंडळांनी सढळ हाताने मदत केली. मिळालेली मदत ही केवळ आर्थिक नसून ती माणुसकीच्या स्पर्शाचे प्रतीक आहे. या रुग्णवाहिकेमुळे अनेक गरजू रुग्ण आणि अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी धावणारी ही रुग्णवाहिका अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरेल, असा विश्वास प्रा. सतीश बागवे यांनी व्यक्त केला.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व देणगीदारांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रवी जाधव तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.












