कलमठमधील 'त्या' अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायतची नोटीस

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 21, 2024 07:55 AM
views 91  views

कणकवली : शहरानजीक कलमठ ग्रामपंचायत हद्दीमध्ये लक्ष्मी चित्रमंदिर नजीक च्या संचयनी गृहनिर्माण सोसायटी च्या आवारात कणकवली आचरा रस्त्यालगत विना परवाना सुरू असलेल्या बांधकाम विरोधात कलम 52 नुसार कारवाई करण्याची नोटीस कलमठ ग्रा.पं. ने काही दिवसांपूर्वीच दिली होती. या नोटीस नंतर काही दिवस हे बांधकाम थांबवल्यानंतर आज पुन्हा हे बांधकाम सुरू असल्याची बाब निदर्शनास येताच या बाबतची पंचयादी करण्यात आली.

सदर जागेवर विना परवाना चिरेबंदी चौथरा घालून बांधकाम सुरू असल्याची तक्रार कलमठ ग्रा. पं कडे करण्यात आली. सदर तक्रारी ची खात्री करण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांच्यासह घटनास्थळी जात पाहणी करुन पंचयादी घातली असून कलम 52 नुसार कारवाई करण्याबाबत नोटीस देण्यात आल्याची ग्रा. वि. अधिकारी कुडतरकर यांनी माहिती दिली.अधिकारी कुडतरकर यांनी माहिती दिली. घटनास्थळ पाहणी वेळी ग्रा पं सदस्य अनुप वारंग, श्रेयस चिंदरकर, नितीन गणपत पवार उपस्थित होते. नियमानुसार याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.