'मनात घर केलेल्या आठवणींचा रियुनियन'

Edited by: मनोज पवार
Published on: August 19, 2025 18:57 PM
views 18  views

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या डिप्लोमा इन फार्मसी विभागातर्फे आयोजित "माजी विद्यार्थी पुनर्भेट सोहळा २०२५" मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. "मनात घर केलेल्या आठवणींचा रियुनियन" या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यासाठी महाविद्यालयीन परिसर आकर्षक सजवण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  अनिरुद्ध निकम (कार्यअध्यक्ष, राधा गोविंद फाउंडेशन, सावर्डे) उपस्थित होते. उप-प्राचार्य प्रवीण वाघचौरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच प्रा. श्री. संदीप बर्डे यांनी उप-प्राचार्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. ललिता नेमाडे, प्रा. डॉ. अश्विनी पाटील, प्रा. डॉ. अनुराधा गावडे, प्रा. श्री. मदन पोमाजे, प्रा. प्रितम चौधरी  आदी प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले तसेच आपल्या मूळ संस्थेशी घट्ट नाते जोडून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना प्रेरित केले.

शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सभागृहात आयोजित या सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि गप्पांच्या मैफिलीने कार्यक्रम रंगतदार झाला. माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करत नव्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उपस्थित माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या भागाचे सूत्रसंचालन प्रा. पारस चव्हाण यांनी कुशलतेने केले. स्वादिष्ट भोजनाची देखणी व्यवस्था प्रा. मयूर वारे यांनी केली, ज्याची सर्वांनी विशेष प्रशंसा केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता कदम व प्रा. अमृता नवाळे यांनी केले तर अखेरीस प्रा. मानसी महाडिक यांनी आभार प्रदर्शन करून या भावनिक मेळाव्याची सांगता केली.

हा माजी विद्यार्थी पुनर्भेट सोहळा २०२५ सर्व उपस्थितांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला.