निधी मिळाला पण कर्मचारीच नाहीत

सिंधुदुर्गातील जमिन आरोग्य पत्रिका रखडल्या
Edited by:
Published on: December 12, 2023 10:34 AM
views 161  views

सिंधुगुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी अभावी जमीन आरोग्य पत्रिका न दिल्याबाबत विधानपरिषदेत आमदार अनिकेत तटकरे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच लक्ष वेधलं. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ हजार ३६० जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्याचे उद्दिष्ट असताना कृषी विभागाने २ हजार ४५ शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतील माती नमूने घेतले असल्याचे व त्यापैकी १ हजार ६६५ नमूने प्रयोगशाळेत पाठविले असता त्यातील अवघ्या २०० नमुन्याचीच तपासणी करण्यात आली असल्याचे दिनांक २९ जुलै, २०२३ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का ? असा सवाल केला. यावर हे खरे असल्याच मंत्री म्हणाले. तर जमिनीच्या आरोग्यपत्रिका तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता असून निधी प्राप्त करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे असे जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचेकडून सांगण्यात येत आहे, हे ही खरे आहे का ? यावर हे खरे नाही.

प्रयोगशाळेची मंजूर तांत्रिक कर्मचारी संख्या ६ असून माहे जूलै, २०२३ अखेर प्रयोगशाळेत केवळ दोन कर्मचारी कार्यरत होते. उर्वरीत कर्मचारी पदे बदली, पदोन्नती आणि सेवा अधिग्रहीत केल्यामुळे अकार्यरत होती. सध्या प्रयोगशाळेत तीन नियमित कर्मचारी व करार पध्दतीवर दोन तांत्रिक विश्लेषक कार्यरत असून नमूना तपासणीची कार्यवाही वेगाने सुरु आहे अस श्री. मुंडे म्हणाले.

दरम्यान, शासनाने आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला आहे काय असल्यास केव्हा व किती निधी उपलब्ध करुन दिला आहे हे ही खरे आहे का ?  नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत असा सवाल केला असता 

धनंजय मुंडे म्हणाले, सन २०२३-२४ साठी राज्यातील सर्व जिल्ह्यांकरीता रुपये ३.८३ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याला योजनेचा पहिला हप्ता रुपये ५,४७,८५०/- इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तर विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही असं ते म्हणाले.