गोवा बनावटीच्या दारुसह १३ लाख २९ हजार ६८० चा मुद्देमाल जप्त

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 20:06 PM
views 133  views

उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील पथकाने संशयित वाहनाचा पाठलाग करत गोवा बनावटीच्या दारुसह एकूण १३ लाख २९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.उत्पादन शुल्क विभागाची मागच्या दोन दिवसात ही दुसरी कारवाई असून मुंबई गोवा महामार्ग अवैध दारू वाहतुकीसाठी आंदण बनला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.ही कारवाई मळगाव येथील पुलावर करण्यात आली.या प्रकरणातील महिंद्रा स्कॉर्पिओ जीजे-१-आरवाय १४३ ही गाडी जप्त करण्यात आली.तर अंधाराचा फायदा घेत चालकाने पलायन केले.

याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार गोवा राज्यातून स्कॉर्पिओ मधून दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोव्यातून येणाऱ्या संशयित गाडीला इन्सुली येथील नाक्यावर तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र चालकाने सुसाट गाडी नेण्याचा प्रयत्न केला.या गाडीचा उत्पादन शुल्क विभागाने पाठलाग करत मळगाव पुलावर ही गाडी अडवण्यात यश मिळवले.मात्र तत्पूर्वी चालकाने पलायन केले.

दरम्यान या गाडीत मॅकडॉल नं.१ व्हिस्कीचे ३७ बॉक्स याची किंमत ३ लाख १९ हजार ६८० रुपये आढळून आले.या दारुसह १० लाखांची स्कॉर्पिओ गाडीही जप्त करण्यात आली.

ही कारवाई प्रभारी अधिक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली तपासणी नाका निरीक्षक संजय मोहिते,दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर,सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे,जवान दीपक वायदंडे,रणजित शिंदे यांनी केली.अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करत आहेत.