
सावंतवाडी : आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीडशे वर्षे झालेल्या केवळ तीन मराठी शाळा असून त्यात आजगाव शाळेचा सामावेश आहे. हे आजगावचे भूषण असून शाळेने दर्जेदार शिक्षणाबरोबर सुसंस्कृतीचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या शाळेत रशियातून एक विद्यार्थी प्रवेश घेतो, ही बाब जिल्हावासियांना गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.
आजगाव केंद्र शाळेला दीडशे वर्षे झाल्याने शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात खासदार राऊत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी आमदार शंकर कांबळी होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, माजी सभापती चंद्रकांत गावडे, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी उपसभापती चंद्रकांत कासार, आजगाव माजी सरपंच सुप्रिया मेस्त्री, नवनिर्वाचित सरपंच यशश्री सौदागर, भोमवाडी सरपंच विद्या वाडकर-वराडकर, आबा सावंत, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, सुरेश शेट्ये, केंद्र प्रमुख शिवाजी गावीत, महादेव देसाई, कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापिका ममता जाधव, सौ. देशपांडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अण्णा झाट्ये, सचिव विलासानंद मठकर आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी, विज्ञान, कलादालन अशा विविध प्रदर्शनांचे उद्घाटन केल्यानंतर समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे खा. राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी राऊत यांनी दीडशे वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना ब्रिटीशांच्या नजरकैदेत देश असताना दूरदृष्टी ठेवून ज्या व्यक्तीनी शिक्षणाची ज्ञानगंगा येथे आणण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करून दक्षिण भारतात मातृभाषेतूनच कसे प्रश्न संसदेत मांडतात याची माहिती सांगून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्याकडे कोणत्याही पदव्या नव्हत्या, मात्र त्यांनी दिलेली अमृतवाणी आजही सरस असल्याचे त्यांनी सांगून शिक्षणाचे महत्त्व आणि संस्कार यांची सांगड घातली. तर उत्तम नागरिक या शाळेतून घडू शकतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
दरम्यान, तीन दिवस सुरू असलेल्या शतकोत्तर महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात येणार आहे.