बँक ऑफ इंडिया बोगस कर्जप्रकरणी सुवर्णकार व कर्जदारांची निर्दोष मुक्तता

ॲड. विलास परब व ॲड तुषार परब आणि सर्व कर्जदार यांच्या तर्फे ॲड. प्रसन्न सावंत यानी पाहीले काम
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 16, 2023 18:33 PM
views 1208  views

कणकवली : बँक आॕफ इंडिया शाखा कणकवली चे अधिकृत सुवर्णकार अजित तळगावकर यानी सन २००४ ते २०/८/२००९ या कालावधीत कर्जदाराना हाताशी धरुन बोगस कर्ज प्रकरणे केली होती. कर्जदाराना हाताशी धरुन बेंटेक्सचे दागिने सोन्याचे आहेत असे भासवून तसा मुल्यांकन दाखला देऊन सोने तारण कर्ज म्हणून अनेक प्रकरणे दाखल केली आणि वेळोवेळी सुमारे रु. १२७०७००/ इतकी रक्कम उचलून सदर सुवर्णकाराने सामील कर्जदारांच्या सहाय्याने व संगनमताने बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केली व सदर रक्कम व्याजासह रू. १७९१०००/ परतफेड नकरता बॕकेचे नुकसान केले .

तत्पुर्वी कर्जदारानी कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बँकेने कर्जदाराना रितसर वसुलीच्या नोटीसा दिल्या तरीही परतफेड न झाल्याने बँकेने एक समिती गठीत करून सोनेतारणाच्या सिलबंद पिशव्या उघडून तपासल्या असता समितीतील सुवर्णकार गजानन साटविलकर याना दागिने कसोटीअंती तारण ठेवलेले दागिने सोन्याचे नसून ते बेंटेक्सचे असल्याचे आढळले. त्यावरून तसे रत्नागिरी झोनल आॕफीसला कळवून बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेवरून सुवर्णकार अजित तळगावकर, कर्जदार दिपक हिर्लेकर, रौनक पटेल, बाळू राऊत, प्रभाकर घोणे, दत्ताराम सावंत , डाॕमनिक राॕड्रीग्ज, दुलाजी सावंत, प्रसाद पाताडे, भिवा सावंत, हनुमंत गावकर, यशवंत यादव, प्रकाश दळवी या बारा कर्जदारांविरूध्द भा.द.वि.कलम ४१६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ नुसार कणकवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेत आला होता.

सदर खटला चालला असता एकूण सात साक्षीदार तपासणेत आले. ठेवलेले दागिने खरे की खोटे याबाबत सबळ पुरावा नसणे तसेच बनावट कागदपत्रावरील सह्यांचा हस्ताक्षर तज्ञामार्फतचा अहवाल नसल्याने आरोपींविरूध्द गुन्हा शाबीत न झालेने कणकवली प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यानी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. बँकेचे सुवर्णकार अजित तळगावकर याचे वतीने ॲड. विलास परब व ॲड तुषार परब आणि सर्व कर्जदार यांच्या तर्फे ॲड. प्रसन्न सावंत यानी काम पाहीले.