गोकुळचं कार्यालय होणार सिंधुदुर्गात ; दुग्ध उत्पादकांसाठी 50 कोटी

जिल्हा बँकेच्या मोठ्या घोषणा
Edited by: देवयानी वरसकर
Published on: October 20, 2022 14:46 PM
views 133  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुचीत केल्याप्रमाणे जिल्हातील दुग्ध उत्पादक शेत‍कर्‍यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत असल्याचे व तो ३१ मार्च २०३१ पुर्वी खर्च करण्याची घोषणा जिल्हा बँकेचे संचालक तथा आमदार नितेश राणे यांनी गोकुळ संचालक व जिल्हा बँक संचालकांच्या बैठकीत केली. जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी पर राज्यातील दुधाळ जनावरे सामुहिक खरेदी करण्याचा निर्णय याच वेळी झाला. तर गोकुळचे संपर्क कार्यालय सिंधुदुर्गात सिंधुदुर्गनगरी येथे सुरु करण्याची घोषणा गोकुळचे चेअरमन आबासाहेब पाटील यांनी याच बैठकीत केली.


कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघाचे सर्व संचालक मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाची जिल्हातील दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी ही महत्वाची बैठक सिंधुनगरी येथील जिल्हा बँक सभागृहात झाली. आमदार नितेश राणे यांच्यासह गोकुळ दूध संघाचे चेअरमन आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर या प्रमुख नेत्यांसह, गोकुळ दूध संघाचे संचालक, जिल्हा बँकेचे संचालक जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक संस्था, दुग्ध उत्पादक शेतकरी आधी या बैठकीला उपस्थित होते. दोन्ही संचालक मंडळांच्या उपस्थितीतील ही पहिली बैठक असून जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी यावेळी दिली.

पुढील चार वर्षांत एक लाख लिटर दुग्ध संकलनाचा संकल्प जिल्हा बँकेने केला असून जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन वाढीला गती देण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा बँकेने यावर्षी पन्नास कोटी रुपयांचा निधी दुग्ध उत्पादनासाठी खर्च करावा अशी सूचना होती. त्यानुसार ३१ मार्च २०२३ या वर्षाअखेर पूर्वी दुग्ध उत्पादक शेतकर्यांसाठी जिल्हा बँक पन्नास कोटी रुपये खर्च करेल अशी घोषणा या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी केली.

आनंद पॅटर्न राबविण्याचा झाला निर्णय

कोल्हापूरमध्ये राबविण्यात येत असलेल्या आनंद पॅटर्न सिंधुदुर्गातही राबविण्याचा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला आहे. प्राथमिक स्वरुपाची औषधेही या जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची तयारी गोकुळने दर्शविले आहे. गोकुळ च्या एकूण बत्तीस योजना असून त्या या जिल्ह्यात राबविण्यास गोकुळने मान्यता दिली आहे. परराज्यातून दुधाळ जनावरे खरेदी करताना दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सामुहिक दुधाळ जनावरे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व त्याचे खरेदीनंतरचे वितरण या जिल्ह्यांत होणार असल्याचेही मनिष दळवी यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दुधाचा संकल्प टप्प्याटप्प्याने पुर्ण करणार : मनीष दळवी


दुधाळ जनावरांचा बंदिस्त गोठे, मुक्त गोठे, चारा निर्मिती केंद्रे, कृत्रिम रेतन केंद्रे, वासरू संगोपन केंद्रे याबाबतचे प्रशिक्षण व या केंद्रांच्या निर्मितीसाठी जिल्हा बँक प्रयत्नशील राहणार आहे व एक लाख लिटर्स दुधाचा संकल्प जिल्हा बँक टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे अशी माहिती यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.