
वैभववाडी : भुईबावडा येथील ताडीमाडी विक्री केंद्रानजीक पाच हजार रूपये किमंतीची गोवा बनावटीची दारू सापडली. स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि वैभववाडी पोलीसांनी आज (ता.६)दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी रिंगेवाडी येथील जितेंद्र जयसिंग चव्हाण याला नोटीस बजावली.
भुईबावडा बाजारपेठेत ताडीमाडी विक्री केंद्राच्या मागे अवैध दारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजु जामसंडेकर, पोलीस हवालदार सदानंद राणे, पोलीस कॉन्स्टेंबल हरिष जायभाय यांनी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
यावेळी जितेंद्र चव्हाण यांच्याकडे ५ हजार ६०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू आढळुन आली. पोलीसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला असून जितेंद्र याला नोटीस बजावून त्याला सोडण्यात आले. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.बी.पाटील करीत आहे.