
सावंतवाडी : पती-पत्नीच्या भांडणातून निर्माण झालेल्या वादात म्हापसा गोवा येथील एका महिलेच ९ मे २०२३ रोजी दोडामार्ग-पाळये येथे खून झाला होता. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील ऋतुराज श्रावण इंगवले (मुळ रा. चंदगड- कोल्हापूर सध्या रा. म्हापसा गोवा) याची जिल्हा न्यायालयाने एक लाख रुपये रकमेच्या जामीनावर मुक्तता केली आहे.
आरोपी तर्फे अॅड. संकेत अभय वी व अॅड. स्वप्नील बबन कोलगावकर यांनी यशस्वी युक्तिवाद करून जामीन मिळविला आहे. महिलेचे तिच्या पतीशी पटत नव्हते त्यामुळे आरोपी यांनी फिरायला जाऊया, असे सांगून दोडामार्ग-पाळये येथे एका कारने आणले आणि त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर भांडण काढून पतीने तिला मारहाण केली. यात एका कपड्याच्या साह्याने प्रथम तिचा गळा आवळला नंतर तिचे हात पाय हे दोरीने बांधून तिला फरफटत ओढत नेऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात टाकून तिच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेचा पती व त्याचा मित्र ऋतुराज श्रावण इंगवले यांना अटक करण्यात आले. तपासा दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली होती. परंतु आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करून महिलेचा मृत्यू हा नमूद दिवशी झालेला नसून प्रेत मिळाल्यानंतर झाल्याचे दाखवून दिले तसेच तपास कसा चुकीच्या पद्धतीने झाला हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर सिंधुदुर्ग येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनी आरोपीला रक्कम रु 1 लाखचा जामीन मंजूर करून ऋतुराज श्रावण इंगवले याची जामीनावर मुक्तता केली आहे.