
मुंबई : कोकण भूमी प्रतिष्ठान तर्फे आयोजित ग्लोबल कोकण महोत्सवाचे उदघाटन मा. भारत गोगावले यांच्या हस्ते पार पडले. 'स्टार्ट अप कोकण - मेक इन कोकण' ही भन्नाट संकल्पना असलेल्या कोकणच्या संस्कृतीला आणि विकासाला नवी चालना देणारा हा सोहळा आहे.
यावर्षी महोत्सवात खास स्टार्टअप कोकण दालन आणि ग्लोबल कोकण उद्योग संमेलन भरवले होते. कोकणातले हुशार तरुण आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन इथे आले. या तरुणांना उद्योगाच्या वाटचालीसाठी राहुल कॉलेज ऑफ एजुकेशन संस्था सीड फंडिंगपासून थेट आयपीओ पर्यंत पोहोचवणार आहे! 'स्टार्ट अप कोकण - मेक इन कोकण' ही संकल्पना म्हणजे फक्त प्रकल्प नव्हे, तर कोकणातल्या माणसांना आर्थिक स्वयंपूर्णतेकडे नेणारी चळवळ आहे. गावागावात स्थानिकांनी उद्योग उभारावेत, आणि कोकणचा विकास कोकणवासीयांच्याच हातून घडावा, हीच खरी प्रेरणा आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना स्वागताध्यक्ष फलोत्पादन मंत्री मा. भारतशेठ गोगावले म्हणाले, "ग्लोबल कोकण महोत्सव दरवर्षी कोकणाबद्दल काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो, खरतर ते बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असत. कोकणातील बारीकसारीक गोष्टी आपण कशा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि लोकांना गावाची आठवण कशी करून देऊ शकतो हे अनुभवण्यासारखं आहे. काही दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्कीच भेट देतील. अस्सल कोकणाचा आस्वाद आणि कोकणाचं वैभव पाहायचं असेल तर या ग्लोबल कोकण महोत्सवाला नक्की भेट द्या."
कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संजय यादवराव म्हणाले, "जागतिक कोकण महोत्सवाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे 'कोकण बिझनेस कॉन्क्लेव्ह' आणि स्टार्ट-अप कोकण - मेक इन कोकण. आम्ही कोकणातील तरुणांसाठी संधी निर्माण करत आहोत जे स्वतःचे व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यास इच्छुक आहेत. आम्ही त्यांना कृषी, पर्यावरण पर्यटन आणि मत्स्यपालन क्षेत्रातील तज्ञ प्रदान करणार आहोत जे योग्य मार्गदर्शन देऊ शकतील आणि व्यवसायाच्या यशाची खात्री करण्यासाठी एक परिपूर्ण रोडमॅप तयार करू शकतील." चार दिवस चाललेल्या या सोहळ्यात कोकणातले यशस्वी उद्योजक आणि तज्ज्ञ मंडळींनी थेट मार्गदर्शन केले. ज्यांना कोकणात उद्योग उभारायचा आहे, त्यांना हक्काची दिशा देण्यात आली.
महोत्सवात लोककला सादरीकरण, कोळी नृत्य, पालखी नृत्य, तारपा, गोंधळ, जाखडी आणि गौरी नृत्य यासारख्या पारंपरिक कलांचा रंगमंचावर झणझणीत अनुभव मिळाला. कौशल इनामदार यांचा 'लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी' हा लोकप्रिय कार्यक्रम देखील रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. तब्बल ५०० हून अधिक कलाकारांनी आपल्या कलेची मोहिनी प्रेक्षकांवर घातली.
यंदा पहिल्यांदाच मराठी तरुणांसाठी हिप-हॉप आणि रॅप संगीताचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. Rukus Avenue Radio (USA) च्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात हिप-हॉप, रॅप, बीटबॉक्सिंग आणि फ्रीस्टाईल परफॉर्मन्सच्या नव्या लहरींनी कोकणाच्या सांस्कृतिक वारशाला आधुनिक टच दिला. यामुळे मराठी संगीताला जागतिक व्यासपीठ मिळवण्याची अनोखी संधी मिळाली.
याचसोबत, हिंदू धर्मातील समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणारा दशावतार नाट्यप्रकार देखील महोत्सवात रंगला. भगवान विष्णूंच्या दहा प्रमुख अवतारांची कथा भव्य नाट्यमय सादरीकरणाद्वारे सादर झाली. ही कला पिढ्यानपिढ्या कोकणच्या सांस्कृतिक इतिहासाला सजीव ठेवते.