
चिपळूण : सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांचा आदर्श ठरवत, कृष्णा अँटिऑक्सिडंट प्रायव्हेट लिमिटेड या चिपळूणमधील औद्योगिक संस्थेने आपल्या स्थापना दिनी एक उल्लेखनीय उपक्रम राबवला. कंपनीच्या ८२ कर्मचाऱ्यांनी सामूहिक रक्तदान करत आरोग्यसेवेतील आपले योगदान दिले.
विशेष म्हणजे, केवळ औपचारिक शिबिरापुरतेच न थांबता, कंपनीने १०० रक्तदात्यांची ‘आपत्कालीन मदतीसाठी सज्ज’ यादी तयार केली आहे. या यादीतील कर्मचारी आवश्यकतेनुसार तातडीने रक्तदानासाठी उपलब्ध राहतात.
अशाच एका प्रसंगी, चिपळूण येथील घाडगे नावाच्या रुग्णाला कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे तातडीने रक्ताची गरज भासली. रुग्णाच्या नातेवाईकांनी कंपनीचे एच.आर. प्रमुख सुयोग चव्हाण यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी वरिष्ठ अधिकारी अशोकजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा युनिटमधील अधिकारी विजयकुमार पाटील आणि सुरक्षा प्रमुख आबासाहेब आवटी यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांचा समन्वय साधला.
यामुळे दीपक पाटील, ऋतुराज पाटील, संग्राम हुजरे, अनिकेत कानसे व पंडित या पाच कर्मचाऱ्यांना तात्काळ कराडला पाठवून वेळेत रक्तदान करता आले. या तत्परतेमुळे रुग्णावर योग्य उपचार शक्य झाले. रुग्ण कुटुंबियांनी कंपनीच्या या सामाजिक सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमात शिवसेना शहर प्रमुख उमेशजी सकपाळ आणि ब्लड लाईन संस्थेचे अमोल टाकळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कंपनीने दाखवलेली संवेदनशीलता आणि सामाजिक जाणिवा औद्योगिक क्षेत्रातील इतर कंपन्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. अशा कृतींमुळेच “माणूसपण” जपले जात असल्याचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचत आहे.