कारिवडे’साठी कायमस्वरुपी वायरमन द्या, अन्यथा बेमुदत उपोषण

सरपंचांची उपकार्यकारी अभियंत्यांकडे मागणी
Edited by: ब्युरो
Published on: July 25, 2023 19:22 PM
views 117  views

सावंतवाडी : कारिवडे ग्रामपंचायत परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने याचा नाहक त्रास कारिवडे ग्रामस्थांना होत आहे. सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टीचा कालावधी असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. कायमस्वरुपी वायरमन नसल्याकारणाने विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. गावाला कायमस्वरुपी वायरमन मिळावा, अशी मागणी कारिवडे सरपंचांनी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता, सावंतवाडी यांच्याकडे केली आहे.  गावासाठी कायमस्वरुपी वायरमन न दिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांसह वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कारिवडे ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असलेले वायरमन श्री. ठेपणे यांची बदली सहा महिन्यांच्या आत ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर माजगावच्या हद्दीमध्ये केलेली आहे. हा समस्त कारिवडे गावावर अन्याय झालेला आहे. सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टीचा कालावधी असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. कायमस्वरुपी वायरमन नसल्याकारणाने विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. याचा नाहक त्रास कारिवडे गावातील ग्रामस्थांना होत आहे.

सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी सुरू असल्याने विजेचे खांब व वाहिन्या पडून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी लेखी कळवूनही संंबंधितांनी अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. कायमस्वरुपी वायरमन न दिल्यास भविष्यात विजेच्या समस्येमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

येत्या आठ दिवसांच्या आत कायमस्वरुपी वायरमन न दिल्यास आपल्या कार्यालयास कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही आमच्या ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांसह आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत, याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी, असे उप कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात कारिवडे सरपंच यांनी म्हटले आहे.