
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भेकुर्ली येथील प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक द्या या मागणीसाठी पालकांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालय गाठले मात्र गटशिक्षणाधिकारी हे शिक्षक समायोजनसाठी ओरोस येथे गेल्याने निराश होत माघारी परतावे लागले. पुन्हा पुढील आठवड्यात गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊ मात्र नवीन शिक्षक भरतीत पदवीधर शिक्षक मिळावा अशी मागणी असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप देसाई, ग्रामपंचायत सदस्य निलेश देसाई यांसह पालक उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना पालक म्हणाले, भेकुर्ली गाव हा दुर्गम भागात येतो त्यामुळे येथील मुलांना शालेय शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळा हेच माध्यम आहे. या ठिकाणी सात वर्ग आहेत आणि एक शिक्षण सेवक आहेत मात्र शिक्षण सेवक यांना ट्रेनिंग, कार्यालयीन कामे असतात त्यामुळे दुसरा शिक्षक आवश्यक आहे या ठिकाणी पदवीधर शिक्षक जागा रिक्त आहे शिवाय येत्या काही दिवसात शिक्षक भरती होणार आहे ते पाहता भेकुर्ली शाळेला पदवीधर शिक्षक मिळावा ही मागणी आहे आणि पटसंख्येची अट न ठेवता दुर्गम हा निकष ठेवावा अशीही मागणी आहे.