
सावंतवाडी : बांबोळी येथील रुग्णालयात गोवा - सालशेत मधील आनंदी दीलखुश गावकर या महिलेला तात्काळ हृदय शस्त्रक्रियेसाठी ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना गोवा येथील सार्थक फाउंडेशन आणि सिंधुदुर्गातील ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या माध्यमातून माजगाव येथील गिरीश सावंत या युवकाने त्वरीत रक्तदान करीत या महिलेचा जीव वाचवला. गिरीश सावंत यांचे हे तब्बल सोळावे रक्तदान असुन या महिलेच्या नातेवाईकांनी गिरीश सावंत यांच्यासह सार्थक फाउंडेशन आणि सिंधुदुर्गातील ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे आभार मानले आहेत.
गोव्यातील आनंदी गावकर या महिलेला तातडीची गरज असल्याचे सार्थक फाउंडेशनचे सुदेश नार्वेकर यांना समजताच त्यांनी सिंधुदुर्गातील ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे आणि कार्यकारिणी सदस्य बाळकृष्ण उर्फ नाना राऊळ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नाना राऊळ यांनी तब्बल तीन रक्तदाते पाठवून या महिलेचा जीव वाचविण्यासाठी तत्परता दाखवली. नेमक्या याचवेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित ओ निगेटिव्ह रक्तदाते गिरीश सावंत (माजगाव) हे बांबोळीत उपचार सुरू असलेल्या आपल्या नातेवाईक रुग्णासोबत होते. यावेळी बाबली गवंडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधताच त्यानी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ बांबोळी रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान केले.