प्राथमिक शाळांना संत रविदास महाराज यांची प्रतिमा भेट ; सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम !

कुडाळ तालुक्यातून उपक्रमास झाली सुरुवात
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 19, 2023 19:42 PM
views 216  views

सावंतवाडी : राष्ट्रसंत गुरू रविदास महाराज यांची जयंती (तिथीनुसार)  यावर्षी रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्वत्र साजरी होत आहे. सर्व थोर पुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंत्या आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत. यामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती अंतर्भूत आहे.

याच धर्तीवर जिल्ह्यामध्ये संत रविदास महाराज जयंती कार्यक्रम अधिक जोमाने व्हावा आणि प्राथमिक शाळा स्तरावरून संत रविदास महाराज सर्वांना माहिती व्हावेत, या उद्देशाने कुडाळ तालुक्यातील  १ ली ते ७ वी पर्यंतच्या ५० प्राथमिक शाळांना संत रविदास महाराज यांची  प्रतिमा भेट देण्याचे कुडाळ तालुक्याने ठरविले आहे.
त्याची सुरुवात म्हणून गुरुवार दिनांक १९ जानेवारी रोजी डिगस शाळा नं. १, डिगस पूर्व विभाग, आवळेगाव नं. १, कडावल, निरुखे, पांग्रड, भडगाव खुर्द या पूर्ण प्राथमिक शाळांना संत रविदास महाराज यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.
यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष मनोहर सरमळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार, माजी तालुकाध्यक्ष राजन वालावलकर, तालुका उपाध्यक्ष साधना चव्हाण, माजी जिल्हा सरचिटणीस श्रीराम चव्हाण, समाज कार्यकर्ते अण्णा चव्हाण (पांग्रड) तसेच संबंधित शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल शिक्षक वर्गाने आनंद व समाधान व्यक्त करून समाज मंडळाला शुभेच्छा दिल्या.
पुढील आठवड्यात ५० शाळांना  संत रविदास महाराज यांच्या प्रतिमा भेट देण्याचे नियोजन असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाने सांगितले.