
चिपळूण : घरडा केमिकल्स चे संस्थापक आणि रसायन शास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. के. एच. घरडा ( वय ९५ वर्षे ) यांचे काल, सोमवार, ता.३० सप्टेंबर रोजी , सायंकाळी ४ वाजता,वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी, आज मंगळवार, ता.१ सप्टेंबर रोजी, दुपारी मुंबईतील मलबार हिल येेेेथे होणार आहे. डॉ. घरडांनी भारतीय रसायन विज्ञान आणि ॲग्रोकेमिकल उद्योग क्षेत्रात केलेल्या काही नवीन संंशोधन आणि उत्पादनांचे मोठे योगदान आहे. ज्यामुळे त्यांची जगात त्यांची ओळख कायम राहील. ते घरडा केमिकल्स लिमिटेड चे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य सल्लागार होते. ज्यांनी आपल्या कौशल्याने, संशोधन आणि विकासास पुरक दृष्टिकोनातून भारतात अनेक उत्पादनांची सुरुवात केली.
डॉ. केकी होर्मुसजी घरडाचा जन्म २५ सप्टेंबर १९२९ चा . त्यांनी मुंबई विश्व विद्यापीठातून रसायन प्रौद्योगिकी विभागातून पदवी मिळवली होती.पदवी नंतर अमेरिकेत मिशीगन विश्व विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीत मास्टर्स आणि ओक्लाहोमा विश्वविद्यालयातून रसायन शास्त्रात पी.एच.डी. मिळवली होती. आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परत आल्यावर डॉ. घरडांनी घरडा केमिकल्स ची स्थापना केली. जी कंपनी आज भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांमधील एक ॲग्रोकेमिकल कंपनी आहे. त्यांनी रसायन शास्त्र आणि केमिकल अभियांत्रिकी क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल, अमेरिकन इंस्टीट्यूट ऑफ केमिस्ट्स मार्फत, 'केमिकल पायोनियर' पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाकडून (FICCI) 'रिसर्च एंड टेक्नोलॉजी' साठी पुरस्काराने सम्मानित केले गेले आहे. २०१६ साली त्यांना कृषी रसायन संशोधनातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
घरडा केमिकल्स लिमिटेड ची स्थापना १९६७ मध्ये झाली आहे. आणि आज चार मोठ्या उत्पादन युनिटसह संशोधनावर आधारलेली मोठी कंपनी आहे. कंपनीचे नाविण्य आणि उच्च गुणवत्ता असलेल्या उत्पादनांच्या विकासात महत्वपूर्ण योगदान आहे. ज्यामुळे भारत, कृषी रसायनांच्या क्षेत्रात मजबूत देश बनला आहे. डॉ. केकी घरडाचा दृष्टिकोन आणि समर्पणाने घरडा केमिकल्सला एक यशस्वी आणि प्रतिष्ठित कंपनी म्हणून नावारूपास आणले आहे. त्यांनी कंपनीच्या माध्यमातून कोकणात आणि कार्यक्षेत्रात शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि विविध सामाजिक क्षेत्रात केलेले कामही कायम त्यांची आठवण देत राहील. त्यांच्या निधनामुळे केवळ त्यांंच्या उद्योगाला नाही तर संपूर्ण देशाला त्यांची कायम उणीव जाणवेल. त्यांचा उद्योग क्षेत्रातील वारसा आणि योगदान कायम स्मरणात राहील.