
सावंतवाडी : मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या लढाईला आपण जी साथ देत आहात ती खरोखरच कौतुकास्पद आहे. मराठा समाजाने अशीच एकी कायम ठेवून आपल्या समाजाचा उद्धार साधावा असे आवाहन मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांनी आंबोली चौकुळ गेळे,येथील ग्रामस्थांच्या साखळी उपोषण प्रसंगी बोलताना केले.
आपण शैक्षणिक संस्था चालवताना कमाल मर्यादेच्या बाहेर इतर समाजाला आरक्षण देत नाही. मराठा समाजाच्या जागेत इतर समाज घुसणार नाही याची दक्षता घेतो असे रोखठोक प्रतिपादन यावेळी बोलताना विकास सावंत यांनी केले. 18 पगड जातींना शिवाजी महाराजांनी बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती आमचे आराध्य दैवत आहे.त्यांच्या शिकवणीनुसारच मराठा समाज आपल्या न्याय्य हक्कासाठी लढत आहे. आता कोण आपल्याला आरक्षण मिळवून देणार यावर विश्वास न ठेवता आपली लढाई आपणच लढली पाहिजे हे प्रत्येकाने शिकले पाहिजे.
यासाठी गावागावात अशा प्रकारचे उठाव व्हायला हवेत असे मत यावेळी बोलताना विकास सावंत यांनी व्यक्त केले. सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी चौकुळ, आंबोली, गेळे, गावातून पहिले साखळी उपोषण होत आहे. सह्याद्री पट्ट्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आपली एकी इतरांना प्रेरणादायी ठरेल व आपले हक्काचे आरक्षण आपल्याला शंभर टक्के मिळेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी दिनेश गावडे भाऊ जाधव आकाश मिसाळ राघोजी सावंत उमेश सावंत राजन सावंत चौकुळ आंबोली, येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.