उपद्रवी कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा | काँग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

Edited by: दिपेश परब
Published on: September 12, 2023 15:51 PM
views 101  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला शहरातील गाडीअड्डा येथे एका लहान मुलावर अचानक ८ ते १० कुत्र्यांनी हल्ला करून त्याला चावून गंभीर जखमी केले. ही गंभीर बाब असून नगरपरिषद ने या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आज राष्ट्रीय कॉंग्रेस च्या वतीने मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांच्या समवेत हे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तसेच प्रकाश डीचोलकर, दादा सोकटे, सुहास मांजरेकर, महेश वेंगुर्लेकर, सुदेश वेंगुर्लेकर, कृतिका कुबल आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ला शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे, कालच भालचंद्र प्लाझा, गाडीअड्डा येथे लहान मुलावर अचानक ८ ते १० कुत्र्यांनी हल्ला करून त्याला चावून गंभीर दुखापत केली आहे.

ही एक घटना झाली अशा अनेक घटना शहरातील विविध भागात सर्रास घडत आहेत. नगरपरिषदे मार्फत काही महिन्यांपूर्वी या मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहिम राबविली होती परंतु वरिल घटनांवरून ती मोहिम अयशस्वी झाल्याचे निदर्शनास येत आहे, तरी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी लवकरात लवकर करवा असे या निवेदनात म्हटले आहे.