
वेंगुर्ले:
शेतकरी, आंबा बागायतदारांनी काळाबरोबर सातत्याने बदलत गेल पाहिजे अन्यथा कर्नाटकचा हापूस येऊन तो वेंगुर्ला मध्ये विकला जाऊ शकतो. हे रोखण्यासाठी आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. याचा पुढाकार घेण्याचा काम जिल्हा बँक व खरेदी विक्री संघाने केले आहे. या तालुक्यातील आंबा वेंगुर्ले हापूस म्हणून पुणे, मुंबईत विकला जाऊ शकतो शकतो. शेतकऱ्यांचा पिकवलेला आंबा तालुका खरेदी विक्री संघाच्या ब्रँड खाली हा मार्केट मध्ये घेऊन जाऊ शकतो. यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी आमच्यावर सोडा. तुमचा माल विकत घेतला जाईल आणि तालुका संघ पुढे विक्री करेल अशी यंत्रणा उभी करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी वेंगुर्ले येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक व वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज २ मार्च रोजी आंबा बागायतदार, शेतकरी मेळावा येथील साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी बोलत होते. या मेळाव्यात आंबा पिकासाठी लागणारी खते, औषधे याबाबत विविध प्रश्न तसेच उत्पादित माल, आंबा प्रक्रिया, कॅनिंग, पॅकिंग व विक्री व्यवस्था या सर्व प्रश्नांच्या संदर्भात या सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, प्रगतशील आंबा बागायदार महेश सामंत, प्रकाश गडेकर, जिजि साळगावकर, जिल्हा बँक चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँक माजी संचालक नितीन कुबल, दाजी परब, बाळा गावडे, जनार्दन पडवळ, नाथा सावंत आदी उपस्थित होते. तर मेळाव्याला तालुक्यातील आंबा बागायतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना मनिष दळवी म्हणाले की, वेंगुर्ले तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन केले जाते तर आंबा बागायतदार यांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यामुळे या सर्व शेतकरी बागायतदार यांना एकत्र आणण आणि जिल्हा बँक व खरेदी विक्री संघ यांच्या मार्फत त्यांना पाठबळ देणं व त्याचा उत्पादित माल "वेंगुर्ला आंबा" हा ब्रॅण्ड म्हणून मार्केट मध्ये घेऊन जाणे, त्याची एक वेगळी ओळख निर्माण करणं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांचा आंबा विक्री हा ज्वलंत प्रश्न आहे. आंब्या बाबत जीआय नामांकन व इतर संपूर्ण प्रक्रिया याबाबत आम्ही सर्व एकत्रित काम करणार आहोत. त्यामुळे पुढच्या काळात या तालुक्यातील आंबा एका बॅनर खाली विकण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.
बोगस खत कंपन्या, औषधे कंपन्या ऑरगॅनिक खते, औषधांच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. यात सकारात्मक भूमिका घेऊन कठोर निर्णय घ्यावे लागतील. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. तालुक्यात किमान १० रापनिंग चेंबर उभे राहतील तेव्हा आंब्यावर योग्य प्रक्रिया होईल व तेव्हा खऱ्या अर्थाने वेंगुर्ला ब्रँड वर विश्वास प्राप्त होईल. असेही मनिष दळवी यावेळी म्हणाले.
सध्या वातावरणात होणारे बदल अधिक तीव्र होत आहेत. पुढच्या १० वर्षात हे बदल अधिक जास्त होतील. त्यामुळे याबाबत आत्ताच विचार केला पाहिजे असा मेळावा आयोजित करून याबाबत निर्णय घेणे हे कौतुकास्पद आहे. याबाबत धोरणात्मक विचार करणारी एक कमिटी करावी लागेल. आंबा बागायतदार यांचे गट तयार करावेत. तसेच ब्रँडिंग होणे गरजेचे आहे. असे यावेळी डॉ प्रसाद देवधर यांनी सांगितले. यावेळी महेश सामंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय रेडकर यांनी केले.










