
बांदा : येथील बाजारपेठ आणि शहराचा भविष्यात होणारा विस्तार लक्षात घेता या ठिकाणी मिनी अग्निशमन यंत्रणा मिळावी, अशी मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी दिली. शहरात सोमवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे आग लागून किराणा दुकानाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर श्री. काणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काणेकर पुढे म्हणाले, बांदा शहराचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु बाजारपेठेतील दुकानाची परिस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी मोठी अग्निशमन वाहन नेणे शक्य नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मिनी अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या माध्यमातून आपण पालकमंत्र्यांकडे करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.