
सावंतवाडी : आंबोली नांगरतासवाडी येथील रस्त्यावर अज्ञात वाहनाने ठोकर देत गंभीर दुखापत झाल्यामुळे एका गव्या रेड्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची ग्रामस्थांनी सांगितले.
हा गवा रेडा ऊस शेतीकडून डोंगराच्या दिशेने जात असताना रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याला ठोकर दिली. त्यामुळे या गव्याच्या पाठीमागील भागाला जबर दुखापत झाली. यात गव्याचा मृत्यू झाला. त्याला गंभीर दुखापत झाली होती. साडेदहा वाजेपर्यंत तो जिवंत होता. परंतु, रविवार असल्याने कोणीही पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध न झाल्याने त्याच्यावर कोणतेही उपचार होऊ शकले नाही, यात गव्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वन्य प्राणी प्रेमींमधून अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावा, यासाठी वनविभागाने कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे अशाप्रकारचे मृत्यू कमी होतील व योग्यवेळी उपचार मिळाल्याने वन्यप्राणी वाचतील असेही सांगण्यात आले. आंबोलीमध्ये तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक तात्काळ करण्यात यावी अशी मागणी होत आहे.