
देवगड : देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी विविध उपक्रम राबवत देवगड तहसील कार्यालयाला नवी ओळख निर्माण करून दिली. ३६ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर ते प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत असले, तरी निवृत्तीची तारीख आणि वेळ माहिती असतानाही त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत जनतेसाठीची कामे तितक्याच तत्परतेने सुरू ठेवली. देवगड तहसील कार्यालयाचा चेहरामोहरा बदलत सर्वसामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीची तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.
देवगड तहसील कार्यालयाची नवीन इमारत उभी राहिल्यानंतर कार्यालय परिसर अधिक सुबक, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख व्हावा यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यालयाभोवती संरक्षक कंपाउंड वॉल उभारून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. प्रशासनातील माहिती नागरिकांपर्यंत सहज पोहोचावी, यासाठी कंपाउंड वॉच“बोलक्या भिंती” या संकल्पनेतून विविध माहितीपर फलक उभारण्यात आले.
ग्रामीण भागातून विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचा विचार करून ब्लू स्टार कुलरद्वारे थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पावसाळ्यात नागरिकांना चिखल व पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून कार्यालय परिसरात फ्लेवर ब्लॉक बसविण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे तसेच विविध शासकीय कार्यक्रमांच्या वेळी दरवर्षी तात्पुरते व्यासपीठ उभारावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन रमेश पवार यांनी कायमस्वरूपी सांस्कृतिक व्यासपीठ उभारण्यास पुढाकार घेतला. व्यासपीठ परिसर देखील कंपाउंड वॉल बांधून त्याला शासकीय स्वरूप प्राप्त करून देण्यात आले. लहानसहान अडचणी ओळखून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे, ही त्यांच्या कार्यशैलीची विशेष ओळख ठरली.देवगड तहसील कार्यालयातील विविध सुविधा सोडवत त्यांनी कार्पोरेट कंपन्यांप्रमाणे ओळख कार्यालयाला देण्याचा प्रयत्न केला.
अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती किंवा अचानक उद्भवलेल्या समस्यांमध्ये घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेणारे अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख राहिली. “प्रशासन हे जनतेसाठी असते” हा विचार कृतीतून जपत त्यांनी अधिकारापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले. सर्वसामान्य नागरिकांना “आपल्या घरचाच अधिकारी” अशी भावना निर्माण करून देण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे देवगड तालुक्यात लोकाभिमुख, संवेदनशील आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून तहसीलदार रमेश पवार यांचा उल्लेख आवर्जून केला जात आहे.










