
सावंतवाडी : आंबोली गेळे गावातील बाळे भटलेवाडी या ठिकाणी ऊस शेतीतून परत येत असताना शेतकऱ्यांना गव्यान ठोकर दिली. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गेळे येथील शेतकरी दीपक गवस, प्रमोद गावडे, लक्ष्मण गावडे हे आपल्या मालकीच्या मोटरसायकल वरून परतत असताना वाटेत हा प्रकार घडला.
रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या गवा रेड्याने त्यांच्या अंगावर चाल केली. मोटरसायकलला गव्याने दिलेल्या ठोकरीत प्रमोद गावडे व दीपक गवस हे गटारीच्या दिशेने फेकले गेले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. त्यावेळी आरडाओरड केल्याने तो गवा पळून गेला. सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. वनविभागाचा आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके कांबळे यांनी जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे जाण्यास सांगितले. सायंकाळी उशिरा घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला.
अधिक उपचारासाठी जखमींना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातून सावंतवाडी येथे नेण्यात आले. बाबत अधिक तपास आंबोली वनविभागाचे कर्मचारी करत आहेत. आंबोली ऊस शेती परिसरामध्ये हत्तीनंतर आता गवा रेड्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे शेतकऱ्यांचे नुकसान देणार कोण ? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून गवा रेड्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनात्मक पवित्र घेऊ असा इशारा देण्यात आला आहे.