गव्याची दुचाकीला धडक बसून भाऊ-बहीण जखमी

Edited by: विनायक गावस
Published on: August 23, 2023 22:21 PM
views 499  views

सावंतवाडी : दुचाकीने घरी परतत असताना गवारेड्याने धडक दिल्यामुळे साटेली तर्फ सातार्डा येथील दोघे भाऊ बहीण जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माजगाव भाईसाहेब सावंत समाधी समोर घडली. लावण्या मेस्त्री (रा. तळवडे ) व प्रसाद नाईक (रा. साटेली तर्फ सातार्डा ) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लावण्या ही गरोदर असल्यामुळे तिच्या उपचारासाठी भाऊ प्रसाद हा दिला घेऊन सावंतवाडीत डॉक्टरकडे आला होता. यावेळी माजगाव येथे दुचाकीने परतत असताना अचानक रस्त्यावर आडव्या आलेल्या गव्याने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर पडले. तर यावेळी गव्याने प्रसाद यांच्या पोटावर पाय ठेवला अशा परिस्थितीतही प्रसादने उठून आपल्या बहिणीला बाजूला केले. हा प्रकार पाहताच तिथून जाणाऱ्या माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्यासह बंटी शेख गुरु वारंग, नरेंद्र बोंद्रे,अवी पडते आदी युवकांनी त्यांना तात्काळ हरिश्चंद्र पाटकर यांच्या रिक्षात घालून सावंतवाडी कुटीर रूग्णालयात दाखल केले.

सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे किरकोळ जखमा झाल्या आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.