
दोडामार्ग : मणेरी ते कुडासे दरम्यान प्रवास करणाऱ्या अनेकांना काल सोमवारी रात्री मणेरी मध्ये गवा रेड्यांचा कळप आढळून आला. प्रवास करताना अचानक आढळून आलेल्या या गव्यांमुळे अनेक वाहन चालक अक्षरशः भांबावले. तर अनेकांनी या गव्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केले.
गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग तालुक्यात ठीक ठिकाणी गवा रेड्यांचे कळप पहावयास मिळत आहेत. काल सोमवारी रात्री देखील असाच एक कळप मणेरी येथे पहावयास मिळाला. कुंब्रल येथील रहिवासी तथा दोडामार्ग शहरातील प्रसिद्ध सचिन इलेक्ट्रिकल्स चे मालक सचिन आत्माराम सावंत हे काल सोमवारी रात्री आपल्या ओमनी व्हॅन द्वारे मणेरी ते कुंब्रल असा प्रवास करत होते. साडेदहाच्या सुमारास मणेरी येथील गौतमवाडी परिसरात ते पोहोचले असता रस्त्याच्या कडेला लागून त्यांना गवारड्यांचा कळप पहावयास मिळाला. त्यातील एक गवारड्या तर थेट रस्त्यावरून ये -जा करणाऱ्यांकडे टक लावून पाहत होता. श्री. सावंत व त्यांच्या पाठोपाठ असणाऱ्या अनेकांनी आपापली वाहने थांबवली. काहींनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गवा रेड्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये बंदिस्त केले.
हा गवारेडा व कळप हळूहळू अन्य दिशेने गेल्यानंतर सर्वांनी आपापली वाहने मार्गस्थ केली. दरम्यान भर वस्ती नजीक गवेरेडे प्रकारात वाढ झाल्याने अनेक शेतकरी, ग्रामस्थ, सायंकाळी तसेच रात्री प्रवास करणारे वाहन चालक यांच्या मध्ये भीती ते वातावरण पसरले आहे.