
मंडणगड : वाकवली येथील बौद्धजन उत्कर्ष मंडळ मुंबई तसेच बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड, शाखा क्रमांक 25 वाकवली, सूर्यकांत क्रीडा मंडळ, यशोधरा महिला मंडळ, ग्रामीण व माता रमाई महिला मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने आज शुक्रवार दिनांक 16 मे 2025 रोजी साहित्यिक किशोर कासारे यांचे प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाचा विषय होता ,"धम्मचक्र प्रवर्तनाच्या नंतर आंबेडकरी समाज आणि वास्तव" यावर बोलताना श्री कासारे यांनी मुद्देसूद व ओघवत्या भाषाशैलीत आपली भूमिका मांडली . डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन का केले? त्या मागील भूमिका आणि तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म मानवी कल्याणाचा असून त्यातील किमान पंचशीलाचे पालन प्रत्येक व्यक्तीने करावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विहारांमध्ये तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. दीप प्रज्वलन करण्यात आले. धम्म संस्कार विधी बौद्धाचार्यांनी घेतला.
यानंतर मंडणगड तालुक्यातील साहित्यिक किशोर कासारे यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव तर स्वागताध्यक्ष शंकर पवार हे होते. सूत्रसंचालन दिनेश जाधव यांनी केले तर प्रास्तविक अरविंद जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर आयुष्यमान चंद्रमणी जाधव हे उपस्थित होते. त्याचबरोबर शाखेचे सर्व पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी व महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि सर्व सदस्य बंधू, भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाप्रकारे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.