हायवेवर ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून गॅस गळती

Edited by:
Published on: August 12, 2025 12:08 PM
views 318  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून (क्र. MH01 DR 0757) ऑक्सिजनची गळती झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, एका जागरुक वाहनचालकाने ही बाब टेम्पोचालक धीरज गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक धीरज गुप्ता हे ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. पिंगोळी गावाजवळून जात असताना अचानक टेम्पोमधील एका सिलेंडरमधून गॅस गळती सुरू झाली. ही गळती कुडाळ येथील भंगसाळ नदीपर्यंत सुरू होती. एका वाहनचालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने टेम्पोचालक धीरज गुप्ता यांना याची माहिती दिली. आपल्या टेम्पोमधून गॅसची गळती होत असल्याचे लक्षात येताच गुप्ता यांनी तातडीने टेम्पो महामार्गाच्या बाजूला थांबवला. यावेळी टेम्पोच्या मागून मोठ्या प्रमाणात धूरसदृश वायू बाहेर पडत असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केली असता, टेम्पोमध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर असल्याचे आणि त्यापैकी एक सिलेंडर लिकेज असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.