सर्वत्र लसणाचे दर घसरणार

उत्तम पाऊस आणि उत्तर कर्नाटकमधील वाढीव उत्पादनामुळे लसूण मुबलक प्रमाणात उपलब्ध
Edited by:
Published on: March 11, 2025 21:13 PM
views 246  views

लुईस रॉड्रिग्ज | बेळगाव : कांहीं दिवसांआधी सर्वत्र गगनाला भिडलेले  लसणाचे दर लवकरच घसरणार आहेत असा अंदाज व्यक्त होत असुन मागील वर्षी उत्तम पावसामुळे आणि उत्तर कर्नाटकातील काही भागांत लसणाच्या वाढीव लागवडीमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने बाजारात पुरवठा वाढला आहे. गोव्यात जाणारा बहुतेक लसूण पुरवठा हा बेळगाव APMC मार्केट तसेच येथील खासगी होलसल व्यापाऱ्यां मार्फत मार्फत पाठवला जातो. स्वयंपाकघरातील अत्यावश्यक घटक असलेल्या लसणाच्या किंमतीत मागील काही काळात मोठी वाढ झाली होती, ज्यामुळे प्रति किलो सुमारे 400 पर्यंत दर गेला होता.

मात्र, जास्त नफ्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लसूण लागवड केल्यामुळे आता बाजारात प्रचंड पुरवठा वाढला आहे आणि त्यामुळे दर कोसळले आहेत. परिणामी, शेतकरी मानसिक आणि आर्थिक संकटात सापडले आहेत.

"मागील हंगामात लसणाचा दर प्रति क्विंटल ₹35,000 इतका गेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र, या हंगामात दर घसरून ₹7,000-₹8,000 प्रति क्विंटलपर्यंत आले आहेत, याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे. आधी प्रति किलो ₹400 असलेला लसणाचा दर आता ₹150 च्या आसपास आला आहे, त्यामुळे ग्राहकांना फायदा होईल," असे बेळगाव APMC बाजारातील एका व्यापाऱ्याने सांगितले.

APMC अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, विजयपूर, बागलकोट, दावणगेरे, गदग, धारवाड, चित्रदुर्ग आणि हरिहर या कर्नाटकमधील जिल्ह्यांमध्ये लसणाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. "गेल्या वर्षीच्या वाढलेल्या दरांमुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवडीचे प्रमाण वाढवले, परिणामी उत्पादन खूपच वाढले आणि बाजारातील दर कोसळले," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान येथून मोठ्या प्रमाणात लसूण आयात होत असल्याने आणि या भागांमधील संकरित जातींच्या लसूण उत्पादकांनी दिलेल्या स्पर्धेमुळेही दर घसरले आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विजयपूर जिल्ह्यातील निडगुंडी तालुक्यातील मुद्देश्वर मार्केट हे मोठे घाऊक लसूण व्यापार केंद्र असून येथे दररोज ५०० ते १,००० क्विंटल लसूण विकला जात आहे.

बेळगाव, बागलकोट, गदग, हुबळी आणि दावणगेरे येथील घाऊक व्यापारी विजयपूरमधून लसूण खरेदी करून गोव्यात पाठवतात. एका शेतकऱ्याने सांगितले की, "मी २ एकर शेतीत लसूण लागवडीसाठी ₹१ लाख गुंतवले. मागील हंगामात लसूण ₹१४,०००-₹१८,००० प्रति क्विंटल दराने विकला जात होता, पण आता दर खूपच घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे," . सर्वत्र लसूण उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अशीच असल्याचा बेळगाव APMC येथील घाऊक व्यापारी संभाजी होनगेकर यांनी सांगितले. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, शेतकरी कर्नाटक सरकारकडे आधारभूत किंमत जाहीर करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून त्यांचे नुकसान भरून निघेल.