KOKAN FESTIVAL | आयपीएस अधिकारी सुब्रमण्य केळकर यांचा हैदराबाद इथं गणेशोत्सव

बुद्धीच्या देवतेला पुस्तकांची आरास
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: September 01, 2022 08:00 AM
views 248  views

सावंतवाडी : कोकणाचे सर्वात मोठे उत्सव पर्व म्हणजे श्री गणेशोत्सव. संपूर्ण जगात कोकणी बांधव कोठेही असेल तेथे तो आपल्या या आवडत्या देवतेचे फार मोठ्या उत्साहाने व मनोभावे पूजन करतो.

 सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा आयपीएस अधिकारी सुब्रमण्य केळकर हे सध्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे आपले आयपीएसचे प्रशिक्षण घेत आहेत. या ठिकाणी त्यांनी स्वतः श्री गणेशाची मूर्ती साकारली व भारतातील तमाम आयपीएस  प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते गणेशोत्सव साजरा करीत आहेत.


महाराष्ट्रातील आणि विशेषत: कोकणातील मुलांना गणेश चतुर्थीचे फार मोठे आकर्षण असते. अनेकदा विद्यार्थ्यांना वसतिगृहात किंवा ज्या ठिकाणी ते शिक्षण - प्रशिक्षण प्रशिक्षण घेत असतात, तेथे आपापल्या पद्धतीने गणेश चतुर्थीचा सण ते साजरे करतात. अशीच एक आगळीवेगळी गणेश चतुर्थी महाराष्ट्रातील आयपीएस प्रशिक्षणार्थींनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे साजरा करण्याचा प्रयत्न केला.


महाराष्ट्राची संस्कृती जपली आंध्र प्रदेशात: महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा तीही आंध्र प्रदेशात जाऊन जोपासण्याचा मानस सिंधुदुर्गचे सुपुत्र व आयपीएस अधिकारी सुब्रमण्य केळकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालाय. एक अत्यंत वेगळी गणेश जयंती हैदराबाद येथील या राष्ट्रीय पोलीस अकादमीत उत्पन्न झाली. हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमी साजरा करण्यात आलल्या या गणेशोत्सवात  केवळ भारतातील नव्हे तर मॉरिशस येथील मुलेही सहभागी झाली होती.

प्रशिक्षणामुळे वेळ मिळत नाही तरी मर्यादित वेळेत हा उत्सव साजरा करण्यात आला व आपल्या आवडत्या बुद्धीच्या देवतेला सर्व प्रशिक्षणार्थींनी वंदन करीत गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला.

या सर्वात आघाडीवर नेतृत्व केले ते सिंधुदुर्ग सुपुत्र सुब्रमण्य केळकर यांनी. लहानपणापासूनच सुब्रमण्य यांना स्वतः अनेक विषयांची आवड असल्यामुळे आणि घरातूनच वैदिक संस्कार झाल्यामुळे त्यांनी स्वतःच पुढाकार घेत गणेश मूर्ती साकारून स्वतःच आपल्या हाताने संपूर्ण विधिवत पूजन केले. आरत्या गाऊन सर्व प्रशिक्षणार्थींनी श्री गणेशांना वंदन केले. एक आगळावेगळा गणेशोत्सव साकारल्याची भावना संपूर्ण भारतातील आणि मॉरिशस येथील प्रशिक्षणार्थ्यांच्या  चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.


पुस्तकांच्या आरासने वेधले लक्ष

राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे आयपीएस अधिकाऱ्यांच्या या प्रशिक्षण केंद्रात सिंधूपुत्र व आयपीएस अधिकारी सुब्रमण्य केळकर यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आलेल्या या अत्यंत वेगळ्या गणेशोत्सवात सर्वात लक्ष वेधून घेतले ते पुस्तकांच्या आरासने. बुद्धीच्या देवता असलेल्या श्री गणेशाला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस सेवा देण्यासाठी सज्ज होणाऱ्या भारतातील तमाम आयपीएस अधिकाऱ्यांनी विविध पुस्तकांच्या आरासने गणपती बाप्पाला मधोमध रेखाटले. बुद्धीच्या देवतेला बुद्धीचे प्रतीक असलेल्या ग्रंथांनी वेढल्यामुळे ही पुस्तकांची आरास अत्यंत विलोभनीय अशा पद्धतीने दिसत होती.

"महाराष्ट्रातील आणि विशेषत: कोकणातील मुलांना गणेश चतुर्थीचे फार मोठे आकर्षण असते. मात्र पोलीस अकादमीत आल्यावर यंदा गणपतीचे ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार की काय, असे वाटत होते. पण महाराष्ट्रातील आम्ही सर्व मुलांनी माझ्या राहत्या खोलीत गणपतीची मूर्ती साकारून पूजा करायचे ठरविले आणि उपलब्ध असलेल्या सामग्रीने पूजा संपन्न केली!"

- सुब्रमण्य केळकर

आयपीएस अधिकारी.