शिरगावच्या राजासमोर साकारला सायबर सुरक्षेचा संदेश देणारा देखावा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 21, 2024 11:03 AM
views 197  views

देवगड  : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा याउपक्रमाअंतर्गत सायबर गुन्हेगारीवर प्रकाश झोत टाकणारा देखावा साकारण्यात आलाय. सार्वजनिक गणपती शिरगावचा राजासमोर हा देखावा साकारण्यात आला होता. शिरगाव येथील दिशा साटम हिने आपल्या कल्पकतेने देखावा साकारलाय.  

शिरगाव येथील साटम परिवाराकडुन सामाजिक संदेश देणारा देखावा येथील गणरायासमोर साकारण्यात आला होता. कमला कॉलेज कोल्हापुर येथील विद्यार्थीनी दिशा दत्तगुरु साटम रा.शिरगाव ता.देवगड हीला क्विक हिल फाऊंडेशन पुणे यांनी सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा याबाबत उपक्रम राबविण्यास दिला होता. या उपक्रमाच्या अनुषंगाने तिच्याकडून  सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा याबाबत या देखव्याच्या माध्यमातून संदेश देनारा व सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणारा देखावा साकारण्यात आला होता. 

गुन्हेगार आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सायबर क्राइमसारखे गुन्हे घडवून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक कशा प्रकारे करतात. इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रलोभने दाखवून बँक खात्यातील रक्कम हडप करण्याचे प्रकार कसा केला जातो. याला आळा घालण्यासाठी संगणक साक्षरतेबरोबरच नागरिकांनी जागरूक व सजग राहणे कशा प्रकारे गरजेचे आहे अशा विविध विषयांवर या देखाव्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आला होता. दिशा साटम या क्चिक हिल फाउंडेशनच्या सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टवर कार्यरत असून, त्या शिरगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी आहेत. तसेच आपल्या मोबाइलवर दिसत असलेल्या सर्वच लिंक या सुरक्षित नसतात, काही लिंक कळत नकळत ओपन केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. अनोळखी व्यक्तीनी मोबाइलवर आपल्या बँक खात्याबद्दल माहितीची विचारणा केल्यावर कोणतीही माहिती देऊ नका. कोणतीही बँक खातेदाराची माहिती मोबाइलवर संपर्क करून कधी विचारणा करीत नाही. हॅकर ओटीपीव्दारे नवनवीन युक्त्या लढवून फसवणूक करू शकतात. 

माहिती तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. अल्पवयीन मुले मोबाइलचा वापर करताना त्यावर पालकांचा लक्ष असणे गरजेचे आहे.त्यांच्याकडून कळत नकळत सायबर गुन्हे घडण्याची शक्यता असते असते त्यामुळे सायबर धोका टाळा, तुमची माहीती सांभाळा, तुमचे डिजिटल जीवन तुमच्या हातात आहे, ते सुरक्षित ठेवा पासवर्ड मजबूत करा, हॅकर्सला हताश करा. सायबर जगात सावध रहा, तुमची डिजिटल संपत्ती सुरक्षित करा असा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला होता.