रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गणेशोत्सव विसर्जन मिरणुकीतील गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करीत आणि ढोल-ताशांच्या गजरात आज वामनद्वादशी दिवशी 1 हजार 883 खासगी तर 9 सार्वजिनक गणपतींना निरोप देण्यात आला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रत्नागिरी शहरातील कर्ला-आंबेशत, खालची आळी, नाचणे, खालची आळी, तसेच शहरजवळील बसणी, काळबादेवी, कोतवडेसह जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. समुद्रकिनाऱ्यांनसह नदीकिनारी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. रत्नागिरीतील भाट्ये आणि मांडवी किनारी दूपारी ३ वाजल्यापासून गणेशभक्तांची वर्दळ होती.
रविवारी सकाळी पावसाने हूलकावणी दिली. मात्र त्यानंतर पावसाने उघडिप दिल्यामुळे गणेशभक्तांच्या आनंद द्विगुणीत झाला होता. गर्दी टाळण्यासाठी गणेशभक्तांनीही या वेळी गणपती विसर्जनाला लवकर सुरवात केली. दुपारपासूनच मांडवी किनारी गणेशभक्तांची ये-जा सुरु झाली होती. पोलिसांचा बदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाला कमी गर्दी होती. आज सायंकाळी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर सुरू होता. शांततेत आणि नियमात राहून भक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची जागोजागी पथके कार्यरत होती. तसेच किनाऱ्यावर निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती.
भाट्ये किनाऱ्याला अधिक पसंती
गौरी-गणपतीसह आज वामन द्वादशी दिवशी गणपती विसर्जनाला रत्नागिरी शहर आणि परिसरातील भक्तांनी भाट्ये समुद्रकिनार्यावर गर्दी केली होती. भाट्ये परिसरासह मारूतीमंदिर आणि त्याबाहेरून येणाऱ्या लोकांची भाट्ये किनारी गर्दी होती. मध्यवर्ती बसस्थानक परिसरासह आजुबाजुच्या भागातील लोकांनी मांडवी किनाऱ्यावर हजेरी लावली. वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागा असल्यामुळे भाट्येकडे अधिक कल असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मांडवी किनाऱ्यावरील गर्दी तुलनेत कमी होती.