कोळेकर भगिनींच्या मदतीला धावले सावंतवाडी राजघराणे

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान मदत केली सुपूर्द
Edited by: विनायक गांवस
Published on: January 06, 2026 19:01 PM
views 336  views

सावंतवाडी : गेली ५० वर्षे जीर्ण झोपडीत अत्यंत कष्टाने दिवस काढणाऱ्या कोळेकर भगिनींच्या जीवनात चार वर्षांपूर्वी सामाजिक बांधिलकीच्या माणुसकीच्या मदतीमुळे हक्काचे छप्पर मिळाले होते. आता पुन्हा एकदा या भगिनींच्या मदतीसाठी सावंतवाडी राजघराणे धावून आले आहे. राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी पाठवलेल्या दोन नवीन गाद्या आज कोळेकर भगिनींना सुपूर्द करण्यात आल्या, ज्यामुळे या थंडीच्या दिवसात दिव्यांग भगिनीला मोठा आधार मिळाला आहे.

काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई यांनी कोळेकर भगिनींच्या पावसातील हालाखीच्या परिस्थितीची व्यथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याकडे मांडली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे अध्यक्ष सतीश बागवे, रवी जाधव, संजय पेडणेकर आणि 'क्रेडाई'च्या माध्यमातून सावंतवाडीतील दात्यांनी एकत्र येत चार वर्षांपूर्वी या भगिनींना सुंदर घर बांधून दिले. या घरात वीज, पाणी, किचन आणि बाथरूमची उत्तम सोय करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी कोळेकर भगिनींच्या घराला भेट दिली होती. यावेळी त्यांना त्यातील एक दिव्यांग भगिनी थंडीच्या दिवसात नुसत्या फरशीवर झोपलेली दिसली. ही विदारक स्थिती त्यांनी तातडीने राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून राणीसाहेबांनी तात्काळ दोन नवीन गाद्यांची व्यवस्था केली आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या भगिनींपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि पेंटर मंगेश सावंत यांनी कोळेकर भगिनींच्या घरी जाऊन या गाद्या सुपूर्त केल्या.