
सावंतवाडी : गावातील गोरगरीब गरजू रुग्णांकरिता आरोग्य सेवा देता यावी या उद्देशाने ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मोफत आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले असून याचा शुभारंभ प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ. सागर विवेक रेडकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला.
गाव पातळीवर गावातील गरजू लोकांसाठी सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.यातीलच एक उपक्रम म्हणून मळेवाड जकातनाका येथील व्यापारी संकुल मध्ये ग्रामपंचायत कडून मोफत आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले असून याचा शुभारंभ प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर सागर विवेक रेडकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. सरपंच सौ मिलन पार्सेकर यांनी डॉ. रेडकर व इतर मान्यवरांचा पुष्प देऊन स्वागत केले. या आरोग्य तपासणी केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करण्याकरिता डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी डॉ.रेडकर सहकार्य करणार आहेत. तसेच इतर आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया असेही डॉ. रेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या तपासणी केंद्रात रुग्णांची वाढ झाल्यानंतर तपासणीचे दिवस वाढवून स्पेशालिस्ट डॉक्टर या ठिकाणी तपासणीसाठी येतील यासाठी आपण प्रयत्न करणार असेही ते म्हणाले. ग्रामपंचायत ने गावातील गोरगरीब गरजू रुग्णांकरिता सुरू केलेले हे आरोग्य तपासणी केंद्र खरोखरच लाभदायी व कौतुकास्पद आहे. गावातील गरजू रुग्णांकरिता मोफत आरोग्य तपासणी केंद्रासाठी सहकार्य केल्याबद्दल डॉ. रेडकर यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच पार्सेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, प्रवीण सावंत,अंगणवाडी सेविका,सीआरपी, मुख्याध्यापक,शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित आमचे मराठे यांनी आभार मानले.










