
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या वास्तवाला सावंतवाडी भटवाडी येथील सतीश सुभेदार यांनी चलचित्र देखाव्यातून हात घातला आहे. गणरायाच्या समोर त्यांनी सिंधुदुर्गवासीयांचा ज्वलंत प्रश्न त्यांनी मांडला आहे. कोकणचा कॅलिफोर्निया नको, गोवा बांबोळी सारखं एक सरकारी रूग्णालय उभारा. कोकणाला त्याची जास्त गरज आहे अस आवाहन करणारा चलचित्र देखावा त्यांनी साकारला आहे.
हा देखावा भटवाडी येथील सतीश सुभेदार यांनी साकारला आहे. यात त्यांनी सिंधुदुर्गवासीयांची व्यथा मांडली आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं. अपघातानंतर रूग्णालयात गेलो की डॉक्टर अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे जा असा सल्ला देतात. उपचारासाठी रूग्णांना गोवा बांबोळी येथे पाठविले जाते. अशात काहींना वाटेतच मृत्यू गाठतो. ४३ वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीला होऊन देखील जिल्ह्यात जीएमसीच्या दर्जाच एकही रूग्णालय नाही ही शर्मेची बाब आहे. हजारो माणसं वेळेवर उपचार न झाल्यानं, बांबोळीला पोहचू न शकल्याने देवाघरी गेलीत. एखाद्या घरातली व्यक्ती दगावते तेव्हा कुटुंबाचा आनंद, आधार घेऊन जाते. याच दुःख ज्याचं जळत त्याला कळत. गोवावासीयांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. परंतू, अजून किती वर्ष आपण गोव्यावर अवलंबून राहाणार आहोत ? आम्ही कोकणी माणसं आहे त्यात समाधान मानणारी आहोत. ना कसले मोर्चे, ना आंदोलन. सरकारकडे रोज उठून रडत बसण आम्हाला मान्य नाही. 'येरे दिसा, भर रे पोटा !' अशी मानसिकता आमची आहे. याचाचा फायदा घेऊन कोकणी माणसाच्या तोंडाला पानं पुसण्याच काम आतापर्यंतच्या सरकारांनी केलं आहे. हाताला काम नसल्याने भुमिपुत्र मुंबई, पुणे, गोव्यात आहेत. त्याबद्दल कधी काही कोकणी माणूस बोलत नाही. परंतु, सरकार म्हणून इतक्या वर्षात गोरगरिबांसाठी साधं एक रूग्णालय उभं करता आलं नाही. किती वर्ष कोकणी माणसाला असं गृहीत धरणार आहात ? असा सवाल करत कोकणी माणूस देखील कधी जागा होणार हे परमेश्वराला ठावूक अशी खंतही त्यांनी या देखाव्यातून व्यक्त केली.
तर कोकणचा कॅलिफोर्निया नको, गोवा बांबोळी सारखं एक रूग्णालय उभारा, त्याची जास्त गरज कोकणी माणसाला आहे असं आवाहन या देखाव्यातून केलं आहे. कोकणी माणसाच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारा हा देखावा गणेशभक्तांच लक्ष वेधत आहे.