गजानन नार्वेकर रक्त - प्लेटलेडचा अग्रेसर दाता

Edited by: मनोज पवार
Published on: January 14, 2025 16:40 PM
views 102  views

संगमेश्वर : सर्वात श्रेष्ठ दान हे रक्तदान मानले जाते. अपघात व विविध आजार याप्रसंगी रक्ताची गरज भासते. प्रसंंगी रक्ता अभावी एखाद्याच्या जीवनावरही बेतते, तेव्हा रक्त आणि रक्तदानाचे महत्त्व कळते.  या दानाचे महत्व ओळखून संगमेश्वर तालुक्यातील धामणी यादववाडीचा तरुण गजानन नार्वेकर याने  रक्तदान करण्यास सुरुवात केली. आजवर त्याने १०८ वेळा रक्तदान केले आहे. आणि पुढे ३०० वेळा प्लेटलेट दान हे राष्ट्रीय कर्तव्य करण्याचा संकल्प सोडला आहे. 

आवश्यकता असलेल्या व्यक्तीला रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.हे कर्तव्य मानून मानवाने जगले पाहिजे.  एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली कि विचारांची ताकदही त्याच प्रमाणात बदलतं असते. अशा अनेक गोष्टींचा विचार करून वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षीपासून गजाननने रक्तदान करण्याचा संकल्प केला.

सध्या तो ४१ वयाचा आहे. आपण वयाच्या ६५ व्या वर्षी हा ३०० वेळा प्लेटलेट डोनेशन करण्याचा संकल्प पूर्ण करुन थांबणार आहे,  असा निश्चय त्याने केला आहे. सध्या गजानन हा मुंबई मध्ये वास्तव्यास आहे. यात तब्बेतीने  चांगली साथ दिल्यास  ४०० चा आकडा पूर्ण करु असा त्याचा ठाम विश्वास आहे. 

रक्तदानावर कामं करणाऱ्या भारतातल्या सर्व संस्थाचा हा सभासद आहे. आपले मुख्य कार्य आहे , ते म्हणजे जनजागृती.  या माध्यमातून आपण सगळ्यांना रक्तदान का करावे रक्तदान केल्यास काय होत हे समजून सांगण्याचा प्रयत्न सतत करत असतो, असे तो म्हणतो.

थॅलेसमिया हिमोफेलिया आणि सिकल सेल रुग्णांना वेळेवर मोफत रक्त मिळावे आणि मुख्य म्हणजे थॅलेसमिया हिमोफेलिया आणि सिकल सेल हे रुग्ण यापुढे जन्माला येऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीची किंवा प्रत्येक गरोदर मातेची  HPLC टेस्ट व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे गजाननचे मत आहे.  समाजात याबद्दल जनजागृती होणे गरजेची आहे. तुमचे रक्त दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो, एवढी ताकत या दानात आहे हे पटवून देण्यास गजानन काही अंशी यशस्वी झाला आहे. 

गजानन नार्वेकर हा पेशी (प्लेटलेट्स)  दान दर महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून सुमारे १० ते १२ वेळा करतो. प्लेटलेट्स दान करताना एकदा सुई टोचल्यावर साधारण एक ते दिड तास डोनेशन साठी लागतात. प्लेटलेट्स दान हि समाजाची सेवा करता यावी यासाठी करत असल्याचे तो सांगतो.