वझरेत शिमगोत्सवातील गाडा उत्सव उत्साहात | भाविकांची अलोट गर्दी

Edited by:
Published on: March 26, 2024 14:46 PM
views 84  views

दोडामार्ग : मेशांच्या जुलूमशाहीचा नायनाट करून मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावात शिमगोत्सव तिसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा गाडा उत्सव मंगळवारी भाविकांच्या आमाप उत्साहात साजरा झाला. तळकोकणात विलक्षण आकर्षण असलेल्या या उत्साहाचा आनंद घेण्यासाठी तालुका व लगतच्या गोवा राज्यातील भाविकांनी ही या उत्सवाला गर्दी केली होती. 

दोडामार्ग तालुक्यात शिमगोत्सवात वझरे गावचा गाडा उत्सव (रथोत्सव) हा जिल्ह्याबरोबर गोवा, कर्नाटक राज्यातही प्रसिद्ध आहे. होळीच्या तिसऱ्या दिवशी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मेशांच्या जुलूमशाहीचा नायनाट करून मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून म्हणून हा रथोत्सव साजरा केला जातो. सुमारे दोनशे वर्षाची परंपरा या उत्सवाला लाभली असून यंदाही हा उत्सव  मंगळवारी मोठ्या उत्साहात हजारो नागरीक व भाविकांच्या उपस्थित पार पडला.

गावचा  हा उत्सव सुरू करण्यापूर्वी ग्रामदेवता श्री देवी केळबाय सातेरी इतर देवताना गावकरी व भाविक मंडळींनी गाऱ्हाणे घातले. व त्या नंतर ढोलताशांच्या गजरात देवाचा कळस रथाच्या ठिकाणी नेऊन रथाचे मानकरी यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. या पुजे नंतर सजवलेल्या रथावर ठरल्याप्रमाणे गावातील मानकरी विराजमान झाले. त्यानंतर शेकडो युवकांनी दोरखंड बांधलेल्या रथ ओढणे चा परंपरागत गाडा उत्सव सुरू झाला. उत्सव पाहाण्यासाठी दोडामार्ग व लगतच्या गोवा रज्यातूनही भाविकांनी  गर्दी केली होती.