
कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून कुडाळ व मालवण तालुक्याला तब्बल २ कोटी ३० लक्ष एवढा विकासनिधी उपलब्ध झाला आहे.
गेले महिनाभर कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातुन कुडाळ- मालवण मतदारसंघात जनसंपर्क अभियान सुरू आहे, या अभियानादरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ व मालवण तालुक्यातील ६२ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी भेट देत पक्ष संघटना व स्थानिक पातळीवरील समस्या यांचा आढावा घेतला होता. यावेळी स्थानिकांकडून सुचविलेल्या विकासकामांकरिता निधी मिळावा अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याजवळ केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खासदार निधीतून २ कोटी ३० लक्ष एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय माजी खासदार निलेश राणे यांनी प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रविंद चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश बापट आणि अन्य मंत्री यांची भेट घेत. कुडाळ-मालवण मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, २५/१५, प्रादेशिक पर्यटन, अर्थ संकल्पीय तरतूद (बजेट), डोंगरी विकास निधी, पुरहानी, दलित वस्ती सुधार योजना, शाळा, अंगणवाडी दुरुस्ती, साकव दुरुस्ती, जलसंधारण, पाटबंधारे आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरघोस निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी केली आहे.
भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर आणि अन्य सर्व पदाधिकारी यांनी विधानसभा प्रभारी निलेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.










