१ जूनपासून दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार | यांत्रिकी नौका किनाऱ्यावर घेण्यास सुरुवात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 25, 2024 13:52 PM
views 135  views

देवगड : देवगड येथे मासेमारी करणाऱ्या नौका समुद्रातून किनाऱ्यावर घेण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाच्या सरी आणि वाऱ्याची बदललेली दिशा यातून मान्सूनची चाहूल लागलीय आहे. १ जूनपासून १५ ऑगस्ट यांत्रिकी नौकांच्या माध्यमातून खोल समुद्रात मासेमारी  बंद राहणार  आहे. यामुळे पुढील दोन महिने येथील यांत्रिकी नौका किनाऱ्यावर ठेवण्यात येतील. बंदी काळात मच्छीमारांनी मासेमारी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे माशांची आवक कमी होणार तसेच मासळीचे दर वाढणार असल्याने खवय्यांना सुक्या मासळीवरच ताव मारावा लागणार आहे.

आता हळूहळू समुद्र आपलं रंग, रूप एकदम बदलून टाकेल. एरव्ही शांत वाटणारा, हवाहवासा वाटणारा हा दर्या पावसाच्या स्वागतासाठी एकदम सज्ज होईल.त्याचा उधाणलेपणा कुणाच्याही आवाक्यातच येणार नाही. ऋतू बदलाचे संकेत जसे जसे येऊ लागलेत, तसतसे समुद्रातसुद्धा बदल होऊ लागलेत आणि या बदलाची चाहूल लागलेला मच्छीमारसुद्धा आपल्या पालनकर्त्या समुद्राचा काही काळ निरोप घेऊन किनाऱ्यावर माघारी लोटलासुद्धा आहे. गेल्या काही वर्षांपासून मासेमारीमध्ये यांत्रिकीकारण आले, यंत्राने माणसाला अपरिमित ताकद दिली आहे. त्यामुळेच एकीकडे ताकद मिळाली. पण अनेक गोष्टींचा ऱ्हास सुरू झालाय. हाच परिणाम मासेमारीमध्ये यंत्रांचा शिरकाव झाल्यानंतर दिसू लागला आहे. पारंपरिक मच्छीमार हे मे महिन्याच्या शेवटी आपली मासेमारी आटोपती घेऊन आपल्या नौका किनाऱ्यावर ओढतात. नारळी पौर्णिमा होईपर्यंत समुद्र उधाणलेला असतो, हाच काळ मोठ्या प्रमाणावर माशांचा प्रजननाचा काळ असतो, तर उधाणलेल्या समुद्रात पारंपरिक नौका घेऊन जाणं हेही तसंच जिकरीचं असतं. पण यंत्रांनी मच्छीमारी व्यवसायात प्रवेश केला आणि काळ, वेळ, ऋतू, दिवस यांचा हिशोब राहीनासा झाला. अनियंत्रित मासेमारी होऊ लागली. छोटी छिद्र असलेली पर्ससीन नेट समुद्रात टाकली जाऊ लागली. या जाळ्यांनी समुद्राचा तळ अक्षरशः खरवडून निघू लागला. याचाच परिणाम होत मत्स्य उत्पादन घटत जाऊ लागलं. त्यामुळेच अखेरीस शासनाला पावसाळ्यातील दोन महिन्यात मासेमारी करण्यावर कायदेशीररीत्या निर्बंध आणणं गरजेचं झालं. 

अर्थात चौकटीतून बाहेर पडून नवं काहीतरी, नव्या सुधारणा करणे आणि आपली प्रगती करणे हा मनुष्य स्वभाव! त्यामुळे मासेमारी व्यवसायातील यांत्रिकीकरण, सुधारणा, बदल हे अपेक्षित आहेतच.आज केवळ पारंपरिक मासेमारी ही चौकट ठेवून व्यवसाय करणे नक्कीच अवघड आहे.

आज मे महिन्याच्या शेवटी जेव्हा बोटी किनाऱ्यावर विसावतात, त्यावेळी दोन महिन्यानंतर सुरू होणाऱ्या हंगामात किती उत्पन्न मिळेल, त्यातून किती फायदा मिळेल हा विचार पारंपरिक मच्छीमाराला पडत असतोच. गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. मासेमारी व्यवसायातील खर्च प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि दुसरीकडे तीव्र स्पर्धा, परराज्यांतील व्यावसायिकांची घुसखोरी आणि त्यातून कमी प्रमाणात मिळणारे मच्छी उत्पादन हा या मासेमारी व्यवसायावर खूप मोठा परिणाम करणारा घटक आहे. याचा विचार होने आवश्यक आहे.

त्यातून बाहेर पडून मच्छीमाराला दर्याच्या लाटांवर स्वार होऊन या व्यवसायात पुन्हा ऊर्जितावस्था आणणे आवश्यक आहे. यासाठी या समुद्र राजावर विसंबलेल्या प्रत्येकाने त्याची संसाधने कशी टिकतील, त्यात माझा सहभाग किती असेल, याचा विचार करणे आज खूप गरजेचे झाले आहे.

पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो. तसेच या काळात समुद्रदेखील खवळलेला असतो. त्यामुळे खबरदारी म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन महिने मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे या नौकांना बंदीच्या काळात मासेमारी करता येणार नाही.हा निर्णय बिगर यांत्रिकी नौकांना लागू नसून बंदी कालावधीत बिगर यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रकिनारपट्टी भागात मासेमारी सुरू राहणार आहे. यामुळे खवय्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. मात्र नौका समुद्रकिनारी उभ्या राहणार असल्याने मागणीच्या प्रमाणात मासळीचा पुरवठा कमी होणार असल्याने मासळीच्या दरात वाढ होणार आहे.